esakal | हिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, सर्वसामान्य कुटुंबे दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर बेचैन झाले आहेत.  

हिंगोली जिल्ह्यात नवीन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ

sakal_logo
By
विठ्ठल देशमुख

सेनगाव (जि. हिंगोली) : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर नवीन शिधा पत्रिका देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, सर्वसामान्य कुटुंबे दसरा-दिवाळी सणाच्या तोंडावर बेचैन झाले आहेत.  

सेनगाव येथील पुरवठा विभागात गेल्या अनेक दिवसांपासून शिधा पत्रिकेचे वाटप बंद आहे. वास्तविक पाहता क्यातील अनेक गरीब कुटुंबे शिधा पत्रिकेपासून वंचित आहेत. अनेकांना अन्न धान्य मिळत नाही. महागाई वाढल्यामुळे धान्य बाजारातूनही विकत घेता येत नसल्याने समस्या वाढलेल्या आहेत.  

हेही वाचा - पीकविमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर सुरू करा- खासदार हेमंत पाटील

सध्या नवरात्र सुरु असून काही दिवसांवर दसरा सण येवून ठेपला आहे. दिवाळीचा सणही वीस दिवसांवर आला आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबांकडे शिधा पत्रिका नसल्यामुळे त्यांना अन्न धान्य चढ्या दराने विकत घेवून कुटुंबाची भूक भागवावी लागत आहे. दिवसभर कष्ट करून आलेला सर्व पैसा अन्न धान्यावरच खर्च होत आहे. यामुळे बाकीचे व्यवहार करायला हाती काहीच उरत नाही. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांच्या हाताला काम मिळत नसल्यामुळे आला दिवस लोटण्याची वेळ असंख्य कुटुंबांवर आलेली आहे. असे असताना तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडुन शिधा पत्रिका वाटपास टाळाटाळ केली जात आहे.   

हे वाचलेच पाहिजे - नांदेड शहरातील पंधरा खासगी कोविड सेंटरमधे केवळ १५१ पॉझिटिव्ह सोमवारी १०१ जण पॉझिटिव्ह पाच मृत्यू

दसरा आणि दिवाळी सण जवळ आल्यामुळे अनेक कुटुंब घरात अन्न धान्य नसल्यामुळे शिधा पत्रिकेसाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. या सनाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड पदार्थ करून सण साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु आज घडीला अनेक गोरगरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आधी कोरोनाने कंबरडे मोडले; नंतर पावसाने हाताशी आलेले पिक हेरावून घेतले आणि आता शासकीय कार्यालयातील अल्पदरात मिळणाऱ्या अन्न धान्याच्या योजनेचा लाभ सुध्दा मिळेना. अशा विचित्र अवस्थेमुळे अनेक कुटुंब हतबल झाले आहेत. वास्तविक पाहता शासनाने गोरगरीबांना अन्न धान्य अत्यंत अल्पदरात मिळावे यासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. परंतु ग्रामीण भागात मात्र अजुनही या योजना गोरगरीब कुटुंबांपर्यंत पोहोचत नसल्याचे वास्तव दिसत आहे. 

आजच्या परिस्थितिमध्ये गोरगरीब जनतेला अन्न धान्य मिळत नसेल तर एकूण परिस्थिती अवघड आहे. वरिष्ठांनी यावर विचार करून दिवाळी सणाच्या तोंडावर गोरगरीब कुटुंबांना शिधा पत्रिकेचे वाटप करून अन्न धान्य पुरवठा सुरळीत करावा. 
- द्वारकादास सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य)

संपादन : प्रमोद चौधरी 

loading image