मराठवाड्यातील उद्योजकतेचा अनुशेष दूर व्हावा : उद्योजक मुकुंद कुलकर्णी

प्रमोद चौधरी
Saturday, 8 August 2020

मराठवाड्यातील उद्योजकतेचा अनुशेष दूर केल्याशिवाय मराठवाड्याचा विकास अशक्य आहे.

नांदेड : ‘उद्योग आणि सेवाक्षेत्र हे महाराष्ट्राचे बलस्थान असून कृषी क्षेत्र विकासाचे मोठे आव्हान आपल्यापुढे आहे. हे आव्हान स्वीकारण्यासाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. मराठवाड्यातील उद्योजकतेचा अनुशेष दूर केल्याशिवाय मराठवाड्याचा विकास अशक्य आहे’, असे मत उद्योजक डॉ. मुकुंद कुलकर्णी यांनी केले. 

पीपल्स कॉलेज व मराठवाडा जनता विकास परिषद औरंगाबादच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास : वास्तव आणि भविष्य’ या विषयावर आयोजित एक दिवशीय वेबिनारप्रसंगी ते बोलत होते. पहिल्या सत्राच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा - अट्टल गुन्हेगार व अपहरणकर्ता विकास हटकर पोलिस चकमकीत जखमी

डॉ. कुलकर्णी म्हणाले की, मराठवाड्याच्या विकासासाठी मूलभूत सोयी सुविधांसाठी सरकारवर अवलंबून असले पाहिजे. परंतु मराठवाड्यात कृषी, सेवा व पर्यटन क्षेत्रात सर्वाधिक संधी आहेत. उदयोजकांनी त्याचा लाभ घ्यावा. गुजरातमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचे त्यांनी धार्मिक पर्यटन बनवले. मराठवाड्यात वेरूळ, परळी वैद्यनाथ व औढा नागनाथ हे तीन ज्योर्तीलिंगे आहेत. या राष्ट्रीय धार्मिक श्रध्देचे धार्मिक पर्यटनात आम्ही अद्यापही रूपांतरित करू शकलो नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

हे देखील वाचाच - Video ; हुतात्म्यांच्या आठवणी जागविणारे प्रेरणादायी ठिकाण... कुठे ते वाचा

मराठवाड्यातील जनतेला पुन्हा आंदोलन करावे लागेल
दुसऱ्या सत्रामध्ये या. रा. जाधव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जायकवाडी प्रकल्प हा मराठवाड्याचा विकासाच्या दृष्टीने वरदान आहे. परंतु आज जायकवाडी प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेच्या ५० टक्केही सिंचन होत नाही. जायकवाडी प्रकल्पाचे रेखांकन न झाल्याने शेतकरी लाभार्थ्यांचे पाण्यावरील हक्क नाकारले आहेत. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्देशानुसार दोन वर्षाच्या आत जायकवाडीच्या कालव्याचे रेखांकन करणे आवश्‍यक होते. परंतु, अद्यापही ते काम पूर्ण झालेले नाही. अर्थातच जायकवाडीसाठी समन्यायी पाणी वाटप होण्यासाठी मराठवाड्यातील जनतेला पुन्हा आंदोलन करण्याची गरज आहे. 

‘‘नांदेडचा गुरुद्वारा, नळदुर्गचा किल्ला, सहस्रकुंड धबधबा, किनवटच्या जंगलाचे पर्यटन आम्ही अद्यापही करू शकलो नाही. तसेच कापूस, तेल, फळे व भाजीपाला डाळीचे मराठवाड्यात प्रचंड उत्पादन असताना यावर प्रक्रिया करणारे उद्योगही उभारू शकलो नाही. सबसिडीसाठी उद्योग न काढता नफ्यासाठी व्यवसायातील आव्हाने समोर ठेऊन उद्योजकांनी पुढे यावे. तरच मराठवाड्याचे मागासलेपण दूर होईल.  
- डॉ. मुकुंद कुलकर्णी, उद्योजक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Backlog Of Entrepreneurship In Marathwada Nanded News