लेणीत येईनात पर्यटक अन्‌ गावात येईना वऱ्हाड 

संकेत कुलकर्णी
Wednesday, 26 June 2019

खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद - खराब रस्त्यामुळे "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या "सकाळ'च्या वृत्ताची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या रस्त्यावर आणि अजिंठ्यात प्रत्यक्ष फिरून "सकाळ'ने पर्यटक, व्यावसायिकांबरोबरच गावकऱ्यांची बाजूही समजून घेतली. त्याचाच हा "ऑन द स्पॉट' रिपोर्ट... 

अजिंठ्याला येत नाही वरात  
अजिंठ्याचे माजी उपसरपंच संजय माली यांनी विदारक अनुभव सांगितला. ते म्हणाले, ""अजिंठ्याच्या एका मुलीचे लग्न जुळविताना वरपक्षाने औरंगाबादला लग्न लावून देण्याची अट घातली. "रस्ता खराब आहे, आम्ही अजिंठ्याला वरात आणणार नाही. दोनशे नातेवाईक बोलाविले, तर पंचवीसही येणार नाहीत. त्यापेक्षा तुम्हीच मुलीला औरंगाबादला घेऊन या; आपण बैठा विवाह करू, असे त्यांनी स्पष्टच सांगितले. म्हणजे जुळलेल्या लग्नाची वरात गावात यायला तयार नाही, अशी भयानक परिस्थिती गावागावांत निर्माण झाली आहे.'' अखेर औरंगाबादेत हा विवाहसोहळा होणार असल्याचेही ते म्हणाले. 

जागोजागी अडथळे, सलग रस्ता कुठेच नाही  
सिडकोतील "सकाळ' कार्यालयापासूनच जळगाव रस्त्याचे अंतर मोजायला सुरवात केली. हर्सूल टी-पॉइंटपर्यंतचा चकचकीत रस्ताही काही ठिकाणी खराब झाला आहे. आंबेडकर चौक, सुरेवाडी चौक, मयूरपार्क चौक आणि टी-पॉइंट या अत्यंत रहदारीच्या ठिकाणांवर अंडरपास असणे गरजेचे असल्याचे दिसून आले. त्यानंतर हर्सूल गावातील अरुंद रस्त्यामुळे या महामार्गावर "बॉटलनेक' तयार झाला आहे. तिथे रोज सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. पुढे महापालिकेच्या जकात नाक्‍याजवळ काम सुरू असलेले दिसले. सावंगी टोलनाक्‍याजवळ एक बाजूचा सिमेंट रस्ता आढळला; पण पुढे दोनच किलोमीटरवर नव्यानेच झालेल्या पाचशे मीटर कॉंक्रिट रस्त्याला जागोजागी मोठाले खड्डे झाल्याचे दिसून आले. पुढे 12.9 ते 13.2 किलोमीटर अंतरातील रस्त्याचा तुकडा बनविलेला दिसला. त्यानंतर 13.5 ते 14.4, 14.7 ते 15.3, 22.5 ते 22.9, 24.7 ते 24.9, 26.2 ते 26.9, 29.1 ते 29.4, 31.5 ते 32.0, 32.1 ते 32.3 अशा लहान-लहान तुकड्यांत एकेका बाजूचे काम सुरू असलेले किंवा पूर्ण झालेले दिसून आले. याच वेळी दुसऱ्या बाजूचा रस्ताही खोदून ठेवल्यामुळे वाहनांना खडखडत जाण्याशिवाय पर्यायच नाही. पुढेही थेट 41.1 ते 41.7 किमी या तुकड्याचे काम सुरू दिसले. त्यानंतर 43.7 ते 50.3 या पट्ट्यानंतर पुढे रस्ता नाही. 68.5 किमीपासून पुढे तर थेट अजिंठ्यापर्यंत कुठेही काम सुरू असल्याचे आढळले नाही. 

अजून वर्ष लागण्याची भीती  
चौक्‍याच्या अलीकडे एका शाळेचे मुख्याध्यापक श्री. सय्यद म्हणाले, की वाहतूक कोंडी रोजचीच आहे. अनेक वाहने इथे पंक्‍चर होतात, सस्पेन्शन खराब होते, वाहनधारकांचे नुकसान रोजचेच आहे. आमच्या शाळेत दूरदूरची मुले येतात. रस्ता धोकादायक बनल्यामुळे पालक मुलांना पाठविताना चिंताग्रस्त असतात. हे गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. कामाची गती पाहता अजून वर्षभरातही रस्ता पूर्ण होईल, असे वाटत नाही. 

गाईड, डोलीवाल्यांवर आली उपासमारीची वेळ  
लेणीत 40 वर्षांपासून गाईडचे काम करणारे अब्दुल नासेर म्हणाले, ""ऑफ सिझनमध्येही अजिंठ्यात रोज किमान एक हजार पर्यटक येत. आता शे-दीडशे लोक येतात. फॉरेनर्सची संख्या झपाट्याने कमी झाली. जो एकदा येतो, तो इतरांना जाऊन सांगतो, की अजिंठ्याला जाऊ नका. त्यामुळे येथील व्यावसायिक, गाईड, पोर्टर, हॉटेलचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. आम्ही या रस्त्याच्या आणि एअर कनेक्‍टिव्हिटीच्या मुद्यावर थेट पर्यटनमंत्र्यांपर्यंत सर्वांना निवेदने दिली आहेत; मात्र कोणीही याकडे लक्ष देण्यास तयार नाही. जेवढा रस्ता बनविण्यात आला, त्याचा दर्जाही अतिशय निकृष्ट आहे.'' तीस वर्षांपासून डोली वाहणारे चाचा म्हणाले, ""आठ दिवस झाले मला काम नाही. इथून 10 किलोमीटरवर आमचं गाव आहे. लेणीत यायला बसचे तिकीट परवडत नाही. आम्ही लोक पायी इथे येतो. काम न मिळाल्याने तसेच परत जातो. घरी पैसे नेले नाहीत, तर उपासमारीची वेळ येते.'' 

एसटीचे घटले उत्पन्न  
अजिंठा टी-पॉइंटपासून लेणीत जाण्यासाठी परिवहन महामंडळातर्फे प्रदूषणमुक्त बस चालविल्या जातात. आता पर्यटकच नसल्याने त्या जागीच उभ्या असतात. 2014 पासून लेणीत सोयगाव आगाराच्या बस आल्या. तेव्हापासून महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न होत असे. मोसम नसतानाही एक लाखापर्यंत कॅश जमा व्हायची. आता रस्त्याचे काम सुरू असल्याने गर्दी कमी झाली. त्यामुळे सध्या महिन्याला पंधरा ते वीस हजार जेमतेम जमा होतात, असे बसचालकांनी सांगितले. एक पर्यटक असला, तरी किमान दर वीस मिनिटांनी गाडी सोडावीच लागते. लेणीला दहा बसगाड्या आहेत. त्या बाहेर चालवता येत नाहीत. पण इथेही नुसत्या उभ्या राहण्यापेक्षा आम्ही त्या आलटून पालटून चालवतो, असे ते म्हणाले. 

मुलाला शाळेत अजिंठा-वेरूळबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे आम्ही अजिंठ्याला आलो. औरंगाबादहून रस्ता खराब असल्याने आम्ही बीबी का मकबरा, पाणचक्की, वेरुळ पाहून रेल्वेने भुसावळमार्गे जळगावला आलो. पण तिथून अजिंठ्याचे पन्नासेक किलोमिटरचे अंतर पार करण्यासाठीच दोन तास लागले. रस्ता चांगला नसेल, तर मी कोलकाताला जाऊन सांगणारच ना, की अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. कोलकात्याहून औरंगाबादला थेट रेल्वे नसल्याने मुंबईमार्गे आम्हाला यावे लागले. 
- विप्लव मुजुमदार, पर्यटक, कोलकाता. 

मी सहावीत शिकतो. अभ्यासक्रमात अजिंठा लेणीचा उल्लेख आल्यामुळे आई-वडिलांसोबत इथे आलो. लेणी छान आहे. मात्र, खराब रस्त्यावर बस आदळून माझ्या गुडघ्याला दुखापत झाली. 
- ललित मुजुमदार, विद्यार्थी पर्यटक, कोलकाता. 

जळगाव-फर्दापूर रस्त्याचीही अवस्था औरंगाबाद-अजिंठा रस्त्यासारखीच आहे. त्यामुळे फर्दापूरच्या सर्वच हॉटेल आणि पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी थोडेथोडे काम सुरू आहे. पण दीड वर्षांपासून जवळपास 70 टक्के व्यवसाय खालावला आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले तरच पर्यटक वाढतील. 
- नंदलाल मंडोरा, ढाबामालक, फर्दापूर. 

अजिंठा लेणीत गेली कित्येक वर्षे आम्ही एमटीडीसीचे रेस्टॉरंट चालवतो. पण या वर्षभरातील मंदी भयानक आहे. अडीच-तीन हजार पर्यटक जिथे रोज येत, तिथे आज लेणीत पन्नास पर्यटकदेखील नाहीत. पर्यटकच नसल्याने केवळ बसून राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. येथे पर्यटकांना प्यायला पाणीसुद्धा उपलब्ध नाही. 
- अरुण मंडावरे, एमटीडीसी रेस्टॉरंट चालक, अजिंठा लेणी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bad road to Ajanta Caves