Jalna News : बदनापूर पोलिसांंना ‘वसाहतीतील’ घरांची प्रतीक्षा

बदनापूर : पोलिस ठाण्यालाही अद्ययावत इमारतीची आवश्यकता
jalna
jalnasakal

बदनापूर : छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला जोडणारा तालुका म्हणून बदनापूरची ओळख आहे. मात्र अशा महत्वाच्या तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ना अद्ययावत पोलिस ठाणे ना पोलिस वसाहत आहे. त्यामुळे कायद्याच्या रक्षकांची मोठी कुचंबणा होत आहे. एकूणच राहण्यासाठी जागा नसल्याने पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अप- डाऊन करावे लागत आहे.

बदनापूर पोलिस वसाहतीला अर्धवट निधी उपलब्ध झाला. परिणामी वसाहतीचे बांधकाम देखील अर्धवट झाले. अर्थात अर्धवट निधीत बदनापूर पोलिस वसाहतीचा केवळ ढाचाच उभा राहिला आहे. मात्र त्यात राहण्यासारखे बांधकाम झालेले नाही. एकूणच जिथे राहता येत नाही अशी पोलिस वसाहत ओस पडली आहे.

अर्थात अर्धवट बांधकाम करून त्यावर झालेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. पोलिस वसाहतीच्या इमारतीच्या खिडक्यांची दारे चोरट्यांनी पळविली आहेत. शिवाय इमारतीच्या भिंतीना तडे गेले आहेत. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत. एकूणच राहण्याची सोय नसल्याने बदनापूर पोलिस ठाण्यात कार्यरत कर्मचारी जालना अथवा संभाजीनगर येथून अप - डाऊन करीत आहेत. एकूणच पोलिस वसाहतीची सोय असताना बदनापूर येथील पोलिस कर्मचाऱ्यांना आर्थिक भुर्दंड आणि अधिकचा वेळ वाया घालवत अप - डाऊन करावे लागते.

पोलिस वसाहतीच्या बांधकामासाठी वर्ष २००९ मध्ये एक कोटी ४९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मात्र बांधकाम झालेल्या वसाहतीच्या खिडक्याच नव्हे तर फरशाही लोकांनी पळवून नेल्या आहेत. या ठिकाणी वस्तीच नसल्याने तेथे आजूबाजूचे लोक शौचालयास येतात. बदनापूर पोलिस ठाण्याची इमारत निजामकालीन अशी जुनाट आहे. या ठिकाणी पोलिसांना काम करण्यासाठी स्वतंत्र विभाग नाहीत. त्यामुळे पत्र्याच्या शेडमधल्या खोलीत बसून पोलिस अधिकाऱ्यांना काम करावे लागते.

अर्थात बदनापूर येथे अद्ययावत पोलिस ठाणे व्हावे, यासाठी अंदाजे साडेचार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविण्यात आले आहे. त्यांनी देखील त्याची शहानिशा करून नव्या पोलिस ठाणे बांधकामाचा आराखडा तयार करून तो पोलिस निरीक्षकांकडे पाठवला आहे. मात्र अद्याप या संदर्भात निधीची उपलब्धता न झाल्याने बदनापूर पोलिस ठाण्याचे बांधकाम कधी होईल? याची शाश्वती नाही. महामार्गावर पोलिस ठाणे असल्याने सततची रहदारी, हॉर्नचे आवाज, उडणारी धूळ आदींमुळे पोलिस कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

पोलिस वसाहत पडली ओस

बदनापूर येथील अर्धवट पोलिस वसाहत शहरापासून तब्बल तीन किलोमीटर अंतरावर तहसील कार्यालयाच्या पलीकडे आहे. या पोलिस वसाहतीसाठी मंजूर झालेला निधी अपुरा होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या कंत्राटदारामार्फत काम केले ते अपूर्ण झाले आहे. त्यात प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यासाठी वन बीएचके असा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी पोलिस निवासस्थाने दिसत असली तरी तो केवळ ढाचा आहे. प्रत्यक्षात चार पैकी एकाही इमारतीच्या एकाही फ्लॅटचे बांधकाम पूर्ण झालेले नाही.

jalna
Jalna News : वंदे भारत रेल्वे सेवेचे तिकीट दर गुलदस्त्यातच

जबाबदार कोण?

बदनापूर पोलिस वसाहतीला पूर्ण निधी मंजूर झालेला नसताना अर्धवट बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निधी खर्च का केला? बांधकामासाठी उर्वरित रक्कम उपलब्ध का करून दिली नाही? अर्धवट बांधकाम करून आता पुन्हा नव्याने बांधकाम करण्याची वेळ आली असेल तर त्यास जबाबदार कोण? याची चौकशी कधी होईल? या प्रश्नांची उत्तरे सामान्य जनतेला मिळणे आवश्यक आहे.

बदनापूर पोलिस ठाण्याच्या नव्या निर्मितीसाठी जवळपास पाच कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले आहे. या संदर्भात आम्हाला बदनापूर पोलिस ठाण्याच्या वतीने प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यास मंजुरी देऊन आम्ही बांधकामाचा आराखडा पोलिस प्रशासनास पाठवला आहे. बदनापूर पोलिस वसाहतीच्या बांधकामासाठी मुळात संबंधित बांधकाम एजन्सीला कमी निधी मिळाला. त्यात बांधकाम अर्धवट राहिले. अर्थात आम्ही पोलिस प्रशासनाला पत्र पाठवून त्यांना अर्धवट बांधकामाची पूर्तता अथवा नव्याने बांधकाम करण्याची मागणी करणार आहोत.

— व्ही.डी. राठोड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बदनापूर

बदनापूर पोलिस ठाणे निजामकालीन असून त्या ठिकाणी नव्याने अद्ययावत बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे. शिवाय बदनापूर पोलिसांना राहण्यासाठी पोलिस वसाहतीचे काम होणे आवश्यक आहे.

— किशोर सिरसाठ,

सामाजिक कार्यकर्ता, पाडळी, ता. बदनापूर

बदनापूर पोलिस ठाण्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे नव्या स्वरूपात बदनापूर पोलिस ठाण्याच्या इमारतीचे बांधकाम व्हावे, यासाठी पोलिस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रस्ताव पाठवला आहे. अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाने हा प्रस्ताव मंजूर करून त्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच बदनापूर पोलिस ठाण्याच्या नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्त निघेल, अशी अपेक्षा आहे. शिवाय पोलिस वसाहतीचे बांधकाम अर्धवट असून कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थानाची नितांत आवश्यकता आहे, अशी माहिती आम्ही वरिष्ठांना कळवली आहे.

— सुदाम भागवत, पोलिस निरीक्षक, बदनापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com