बाळासाहेबांचे स्मारक ठाकरे सरकारच्या दरबारी

माधव इतबारे
बुधवार, 11 डिसेंबर 2019

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्रियदर्शिनी उद्यानातील झाडे तोडण्यास शहरातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महापालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अहवाल सादर केला. 

औरंगाबाद - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सिडको भागातील प्रियदर्शिनी उद्यानात स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठी शेकडो झाडांचे बळी जाणार असल्याने हे स्मारक वादात सापडले आहे. आरे कारशेडमधील झाडे वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामाला स्थगिती दिली. मात्र, औरंगाबादेत बाळासाहेबांच्या स्मारकासाठी झाडांचा बळी दिला जात असल्याने "ढोंगी' सरकार म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ठाकरे यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महापालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 10) मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अहवाल सादर केला. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी प्रियदर्शिनी उद्यानातील झाडे तोडण्यास शहरातील पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती देत येथील झाडांचे एकही पान तोडले जाणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपने ठाकरे यांना टार्गेट करत औरंगाबादेतील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा विषय ऐरणीवर आणला. दरम्यान, महापालिकेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्याच्या निमित्ताने मंगळवारी मुंबईत जाऊन भेट घेतली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सभागृहनेते विकास जैन, माजी महापौर त्र्यंबक तुपे, नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांची उपस्थिती होती. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाविषयीचा अहवाल ठाकरे यांना सादर करण्यात आला. प्रियदर्शिनी उद्यानात चार हजार 889 मोठे, दोन हजार 928 लहान आणि 853 सुकलेली झाडे आहेत. यापैकी एकही झाड तोडण्यात आलेले नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

लवकरच घेणार बैठक 
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व स्मृतिवन उभारण्यासाठी मोकळी जागा उद्यानात शिल्लक आहे. यापूर्वी आपण एकही झाड न तोडता स्मारक उभारण्याचे आदेश दिले आहेत, याची आठवण पदाधिकाऱ्यांनी करून दिली. यावर लवकरच बैठक घेतली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. 

जाणून घ्या - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? 

महापालिकेच्या प्रकल्पांना नाही स्थगिती 
शिष्टमंडळाने मंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. राज्य शासनाने घनकचरा व्यवस्थापनाची 148 कोटींची कामे, 1,680 कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या निधीला स्थगिती देण्यात आली आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर श्री. शिंदे यांनी एकाही योजनेला स्थगिती देण्यात आली नाही असे स्पष्ट केले, अशी माहिती महापौर घोडेले यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Balasaheb's memorial to Thackeray's court