हिंगोलीत केळी उत्पादकांवर ओढावले संकट

waranga banana
waranga banana

वारंगाफाटा (जि.हिंगोली): कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शेतीचे व्यवहार अडचणीत आले आहेत. शेतकऱ्याच्या शेतातील माल शेतातच सडून जात आहे. केळी उत्‍पादकांचेदेखील मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. केळीला उठाव नसल्याने कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे.

कळमनुरी तालुक्‍यातील वारंगाफाटा येथून इसापूर धरणाचा कालवा जातो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आहे. या भागातील शेतकरी नगदी पिके घेतात. यात ऊस, केळी, हळद या पिकांचा समावेश अधिक असतो. या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. मागच्या वर्षी केळीला १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा भाव मिळाला होता. यामुळे या वर्षी केळीचे क्षेत्र वाढले आहे.

हेही वाचा - हिंगोलीत आढळला पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ​

दळणवळण पूर्णतः ठप्प

वारंगाफाटासह सुकळीवीर, जामगव्हाण, दांडेगाव, डोंगरकडा, रेडगाव, वडगाव, वसफळ, डिग्रस, रामेश्वर या गावांत केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरोनाच्या अगोदर सरासरी केळीला १४०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता. मात्र, लॉकडाउन झाल्यामुळे दळणवळण पूर्णतः ठप्प झाले आहे. परिणामी मागणीत घट झाल्यामुळे व्यापारीदेखील फिरकत नसल्याचे चित्र आहे.

कवडीमोल दराने विक्री

एखादा व्यापारी खरेदीस आलाच तर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे केळीची खरेदी होत आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली बाग कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकरी मात्र, आर्थिक आणीबाणीत सापडला आहे. या परिसरातील आर्थिक घडी केळी पिकावर अवलंबून आहे.

केळी परदेशातदेखील होतेय विक्री

केळीचे पीक देशातील मोठ्या राज्यासह परदेशातदेखील विक्री केल्या जाते. मागील वर्षापासून पिकाला मागणी वाढल्याने दरदेखील खूप चांगले मिळत होते. आता मात्र केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

येथे क्लिक कराकळमनुरीत ५० खाटांच्या कोरोना वार्डाची स्‍थापना



पाच लाख पन्नास हजार रुपयांत खरेदी

सुकळी येथील एका शेतकऱ्याची तीन हजार केळीची बाग पाच लाख पन्नास हजार रुपयांत खरेदी केली होती. आता ही बाग एक ते दीड लाख रुपये देऊन जाणार की नाही या बाबत शंकाच आहे.
-केदार बावगे, बावगे फ्रुट कंपनी



आर्थिक मदत तरी करावी

हजारो रुपये खर्च करून उभी केलेली केळीच्या बागेला योग्य दर मिळत नसल्याने पिकाचे करायचे काय ? हा प्रश्न समोर उभा आहे. शासनाने लक्ष घालून पिकाला योग्य भाव मिळवून द्यावा किंवा आर्थिक मदत तरी करावी, अशी अपेक्षा आहे.
-अरविंद मात्रे, केळी उत्पादक शेतकरी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com