esakal | Corona Impact| उत्साह वाढवणारा बॅण्ड बाजा झाला मूक
sakal

बोलून बातमी शोधा

band baja

Corona Impact| उत्साह वाढवणारा बॅण्ड बाजा झाला मूक

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नायगाव (उस्मानाबाद): बॅण्ड बाजा म्हटले की, सळसळता उत्साह. संगीताच्या तालावर थिरकणारे पाय. वन्स मोअरची दाद. पण, कोरोना आणि त्यामुळे राज्य सरकारने लावलेल्या कडक निर्बंधामुळे महिनाभरापासून बॅण्डबाजाचे साहित्य धूळखात पडले आहे. अनेकांच्या नवआयुष्याचा प्रारंभ ताला-सुरात करणारे बॅण्ड पथकातील कलाकार सध्या मोठ्या पेचात सापडले आहेत.

ऐन लगीन सराईत कोरोनाचे संकट उद्भवले अन् कार्यक्रमांची सुपारी रद्द झाली. वर्षभराची गोळाबेरीज विस्कळीत झाली. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या पथकातील कलाकारांचा पडलेले चेहरे बघवत नसल्याची प्रतिक्रिया भारत ब्रास बॅण्ड पथकाचे प्रमुख रामलिंग साखळे यांनी दिली. एरवी या कालावधित एकही तारीख शिल्लक नसलेल्या या पथकातील साहित्यावर सध्या धूळ साचली आहे.

पथकात २० पेक्षा अधिक कलाकार आहेत. प्रत्येकाची कला ठेका धरायला भाग पाडणारी आहे. या प्रत्येक कलाकारामागे कुटुंबात सरासरी सहा जण अवलंबून आहेत. काम नाही. त्यामुळे पथकातील सर्वांच्या चेहऱ्यावर अवकळा पसरली आहे. स्वतःसह अवलंबून असलेल्या कुटुंबातील सर्वांवरच उपासमारीची वेळ आली आहे. आणि समोर पर्याय काहीच दिसत नाहीत अशी हतबलता सर्वांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत आहे. अशीच स्थिती इतर पथकांची आहे.

कला टिकवण्याचे मोठे आव्हान-

या सर्व पथकांमधील कलाकारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची संख्या मोठी आहे. अचानक उद्भवलेल्या अशा काळात या बॅण्ड कला जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार जगविण्याचे मोठे आव्हान पथक प्रमुखांसमोर उभे आहे. उन्हाळ्यात लग्न समारंभ, उरूस, जत्रा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते आणि त्यासाठी बॅंड पथक हे समीकरण आता रूढ झाले आहे. मधल्या काळात डीजेवर निर्बंध आल्यामुळे बॅण्ड पथकाला बरे दिवस आले आहेत. त्यात यंदा कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले आहे.

नवीन कलाकार भरती होण्याची प्रक्रिया थांबली-

पथकात काम करण्यासाठी नवीन कलाकार याच काळात तयार होतात. लोकांना थिरकायला लावणारी कोणती गाणी वाजवायची त्याचा सराव याच कालावधीत केला जातो. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश असल्यामुळे नवीन कलाकार तयार होण्याची प्रक्रियाच थांबली आहे. चालू हंगामातील उत्पन्नावर पुढील वर्षभराचे नियोजन केले जाते. संपूर्ण हंगाम उत्पन्नाविना त्यामुळे वर्षभर खायचे काय? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. पोरीबाळींचे लग्न, मुलांचे शिक्षण या प्रश्नांमुळे तर अनेकांची झोप उडाली आहे.