थकबाकी वसुलीसाठी महावितरम वीज ग्राहकांच्या घरासमोर वाजवणार बॅंड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाकडे वीजबिलाची एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना वारंवार कळवूनही ते वीजबिल भरत नसल्यामुळे आता वीज वितरण कंपनीने शक्कल लढवली असून, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या घरासमोर बॅंड वाजवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची आता पंचायत होणार आहे. 

निलंगा( जि. लातूर)  : वीज वितरण कंपनीच्या ग्राहकाकडे वीजबिलाची एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना वारंवार कळवूनही ते वीजबिल भरत नसल्यामुळे आता वीज वितरण कंपनीने शक्कल लढवली असून, एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकाच्या घरासमोर बॅंड वाजवण्यात येणार आहे. त्यामुळे अशा ग्राहकांची आता पंचायत होणार आहे. 

निलंगा विभागाअंतर्गत तीन तालुक्‍यांचा कारभार चालतो. निलंगा, औसा, शिरूर अनंतपाळ या तालुक्‍यांचा समावेश आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीजबिलाची एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असताना ही थकबाकी भरावी म्हणून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना देऊनही या ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे ही वसुली करण्यासाठी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे आता ज्या ग्राहकाकडे एक लाखापेक्षा अधिक थकबाकी आहे त्या ग्राहकांची वीज खंडित करण्याची कारवाई केली जाणार असून, थकबाकी बिलाच्या वसुलीसाठी आणि त्यांना जागे करण्यासाठी घरासमोर बॅंड अथवा हलगी वाजवण्यात येणार आहे. निलंगा विभागाअंतर्गत अशा 13 ग्राहकांची नोंद येथील कार्यालयात आहे. त्यामध्ये किल्लारी, लोदगा, औसा, शिरूरअनंतपाळ, कासारबालकुंदा, तगरखेडा येथील ग्राहकांचा समावेश आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकीच्या वसुलीसाठी वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसल्यामुळे आता महावितरण कंपनीकडून वसुलीसाठी बॅंड व हलगीचा वापर करून वसुली करणार आहे.

ग्राहकांच्या घरासमोर बॅंड वाजवत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी पोलिस अधीक्षकांनी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. ही मोहीम बुधवारपासून (ता.18) राबविण्यात येणार आहे. 

लातूर जिल्ह्यात 144 ग्राहक 
जिल्ह्यात एक लाखाहून अधिक वीजबिलाची थकबाकी असलेले 144 ग्राहक आहेत. या ग्राहकांच्या घरासमोरच हलगी किंवा बॅंड वाजवून त्यांच्याकडे थकबाकी भरण्यासाठी आग्रह धरण्यात येणार आहे. या ग्राहकांकडे मिळून दोन कोटी 74 लाखांची थकबाकी अडकली आहे. 
 

निलंगा विभागांतर्गत 13 ग्राहकांकडे एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असून, वारंवार कर्मचाऱ्यांनी लेखी व तोंडी मागणी करूनही ही थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे आता त्यांच्या घरासमोर बॅंड किंवा हलगी वाजवून त्यांचा निषेध नोंदविण्यात येणार आहे. शिवाय तेथील विद्युत पुरवठा खंडित केला जाणार आहे. 
- व्ही. आर. ढाकणे, कार्यकारी अभियंता, निलंगा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Band to play in front of electricity consumers' house