कोरोनाचा लढा अद्याप संपलेला नाही, पालकमंत्री देशमुखांनी साधला नेत्यांशी संवाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

कोरोनाचा लढा अद्याप संपलेला नाही. पुढे किती दिवस तो चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आगामी काळातही जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि जनतेने सजग राहून वैयक्तिक आणि संघटना पातळीवर नवीन जीवनशैलीचा अंगीकार करून समाज कोरोनापासून सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बुधवारी (ता.१३) त्यांनी झूम ॲपवरून संवाद साधला.

लातूर ः कोरोनाचा लढा अद्याप संपलेला नाही. पुढे किती दिवस तो चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आगामी काळातही जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि जनतेने सजग राहून वैयक्तिक आणि संघटना पातळीवर नवीन जीवनशैलीचा अंगीकार करून समाज कोरोनापासून सुरक्षित ठेवावा, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले. जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बुधवारी (ता.१३) त्यांनी झूम ॲपवरून संवाद साधला.

कोविड-१९ हा विषाणू या संकटाचा एकत्रित सामना करणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. सामूहिक कृती केली तर या विषाणूला आपण रोखू शकतो हे आजवरच्या प्रयत्नात दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळातही आपण एकसंध राहू, सामूहिक प्रयत्नातून कोविड-१९ पासून जिल्हा सुरक्षित ठेवू, असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची रिक्तपदे भरावीत, ग्रामीण भागात शेतकरी शेतात वास्तव्य करीत आहेत तेथे सिंगल फेज वीज देण्यात यावी, पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण व्हावे, खरीप पेरणीसाठी खते, बियाणांचा तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, विलगीकरण कक्षातील व्यवस्था चांगल्या असाव्यात, परजिल्हा व परराज्यांतून येणाऱ्या लोकांमुळे जिल्ह्यात पुन्हा ही साथ पसरणार नाही याची काळजी घ्यावी, पीपीई किट मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात, शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी मदत करावी, शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री होईल अशी व्यवस्था करावी, हातगाडी चालक व मजुरांना मदत करावी, टाळेबंदीमुळे अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था करावी, दारूची दुकाने चालू करू नयेत अशा सूचना अनेकांनी यावेळी केल्या.

नवा रुग्ण वाढला नाही, तर ग्रीन झोनमध्ये लातूर : जिल्हाधिकारी जी.श्रीकांत

या चर्चेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद सावे, भाजपचे गुरुनाथ मगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, रिपाइंचे (आठवले गट) चंद्रकांत चिकटे, समाजवादी पार्टीचे अली शेख, शिवसेनेचे नामदेव चाळक, शेतकरी संघटनेचे अरुण कुलकर्णी, रिपाइंचे (गवई गट) संभाजी चांदेगावकर, शेतकरी संघटनेचे सत्तार पटेल, रिपाइंचे (कवाडे गट) एन.डी. सोनकांबळे, रिपाइंचे (टी.एम. कांबळे गट) कनिष्क कांबळे आदी सहभागी झाले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Battle Not Over Against Corona, Said Guardian Minister Deshmukh