मजुरांचे स्थलांतर होणार नाही याची दक्षता घ्या, राज्यमंत्री बनसोडे यांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

सरकार आणि प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या उपाययोजनांचे तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच लातूर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकाही मजुराचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मजुरांची लॉकडाऊन संपेपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

लातूर : सरकार आणि प्रशासन कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे. या उपाययोजनांचे तंतोतंत पालन सर्व नागरिकांनी करणे गरजेचे आहे. तसेच लातूर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या एकाही मजुराचे स्थलांतर होणार नाही, याची दक्षता घ्यावी. या मजुरांची लॉकडाऊन संपेपर्यंत जेवणाची व्यवस्था करावी, असे निर्देश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.
 
उदगीर विभागाअंतर्गत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत उपविभागातील सर्व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे आदी उपस्थित होते.

वाचा ः कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने लातूरातील रस्त्यांवर शुकशुकाट

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी तंतोतंत पालन करावे. कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या लढाईत सक्रीय सहभागी व्हावे. यासाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता घरीच बसून रहावे, असे आवाहन बनसोडे यांनी केले. तसेच या काळात जिल्ह्यात व उदगीर उपविभागात बाहेरून आलेल्या सर्व मजुरांना प्रशासनाने निवारा, अन्न, पाणी, आरोग्य तपासणीच्या सेवा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच येथून एकही मजूर स्थलांतर करणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सूचित केले.    

आरोग्य विभागाने ज्या लोकांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचे निर्देश दिलेले आहेत, त्या सर्व लोकांनी बाहेर रस्त्यावर फिरु नये. घरातच बसून राहावे. आपल्या स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत सजग रहावे, असे आवाहन बनसोडे यांनी केले. उदगीर उपविभागात सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे सर्व लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोचले पाहिजे याकरता योग्य ती काळजी घ्यावी.  सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी, तसेच नागरिकांनी घराबाहेर न पडता घरपोच किराणा दुकानातील जीवनावश्यक वस्तू मागवाव्यात, असे बनसोडे यांनी स्पष्ट केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be Alert Not Migrate Laborers, Minister Bansode Said