बीड : कोट्यवधी खर्च करूनही पुस योजनेचे ग्रहण सुटेना

थकीत वीजबिल, मनुष्यबळाच्या अभावामुळे दीड महिन्यांपासून योजना बंद
beed ambajogai parali electricity bill water supply scheme
beed ambajogai parali electricity bill water supply scheme

घाटनांदूर : दुष्काळी परिस्थितीत अंबाजोगाई व परळी तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणारी पुस वीस खेडी पाणी पुरवठा योजना डबघाईला आल्याने सात कोटी ८८ लाख रुपये खर्च करून तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले. मात्र आता थकित वीजबिल आणि पुरेशा मनुष्यबळाचा अभाव यामुळे ही योजना गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहे.

दोन वर्षांपूर्वी या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी सात कोटी ८८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून योजना पुन्हा नव्याने उभी राहिली. पुनरुज्जीवनाचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे असल्यामुळे त्यांनी संपूर्ण यंत्र सामग्रीसह ही योजना नवी केली व ती प्रायोगिकत्वावर चालविली देखील. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचा कार्यकाळ संपल्यामुळे ही योजना जिल्हा परिषदेकडे सुपूर्द करण्यात आली. ता.२८ जून रोजी या योजनेवर ९८ लाख रुपयांचे वीजबिल थकीत असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.

पुनरुज्जीवनाच्या तरतुदीमध्येच वीज बिलाचा समावेश असल्यामुळे ही रक्कम ता.१५ जुलै रोजी मंजूर झाली. मात्र अद्याप वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. दरम्यान आता जिल्हा परिषदेकडे योजना चालविण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे ही योजना बंद पडलेली आहे.अंबाजोगाई व परळी तालुक्यासाठी दुष्काळाच्या काळामध्ये पुस वीस खेडी पाणी पुरवठा योजनेने अंदाजे शंभर पेक्षा जास्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. ही योजना दोन्ही तालुक्यासाठी संजीवनी ठरली. सदरील योजना वीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे यंत्रसामग्री, पाइपलाइन नादुरूस्त झाल्या होत्या.

या योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री व पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून योजनेला सात कोठी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून अंबलवाडी उद्भव केंद्रातील २०० एचपी.च्या मोटारी, पुस जलशुद्धीकरण केंद्रावरील ५० एचपी.च्या दोन मोटारी, पाइपलाइन नवीन टाकणे याची निधीमध्ये तरतूद होती. जिल्हा परिषदेकडे पुनरुज्जीवन करण्यासाठी तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आले.

पुनरुज्जीवनाच्या निविदेमध्ये या योजनेची सर्व यंत्रसामग्री नवी टाकणे, पाइपलाइन दुरुस्त करणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन पाइप टाकणे, पुस वीस खेडी जलशुद्धीकरण केंद्राला संरक्षण कुंपण करणे आदींची तरतूद होती. योजना पूर्ण झाल्यानंतर ही योजना प्रायोगिक तत्त्वावर एक वर्ष चालविणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास बंधनकारक होते. त्यानुसार त्यांनी एक वर्ष योजना चालविली. दरम्यान कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पुन्हा एक वर्ष योजना चालविण्याच्या सूचना शासनाकडून त्यांना मिळाल्या. त्यानुसार दोन वर्ष त्यांनी ही योजना यशस्वीपणे चालविली.

यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यानंतर महावितरणचे ९८ लाखांचे बील थकल्यामुळे महावितरणने ता.२८ जून रोजी वीज पुरवठा खंडीत केला. परिणामी या वीस खेडी योजनेवर अवलंबून असलेल्या घाटनांदूरसह दहा गावांतील नागरिकांची ओरड सुरू झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाठ यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून वीजबिल व पुनरुज्जीवनाच्या कंत्राटदाराचे देणे एक कोटी सहा लाख तेरा हजार रुपये शासनाच्या पाणी पुरवठा विभागाकडून ता.१५ जुलै रोजी मंजूर करून आणले.

मंजूर निधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग झाल्यानंतर महावितरणला थकित बिलाची रक्कम देण्यात येणार आहे. दरम्यान बंद असलेला वीज पुरवठा आणि जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडे योजना चालविण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे ही योजना बंद आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पुस वीस खेडी पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या दहा गावांना नदी नाल्यांचे, विहिरीचे, हातपंपाचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घेत तातडीने उपाययोजना करून योजना सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com