
बीड : भाजीमंडईची इमारत बनली ‘लघुशंका स्थळ’
बीड : सध्या असलेल्या भाजी मंडईत दोन शाळा असल्याने रस्त्यावर लावलेल्या फळ - भाज्यांच्या वाहनांचा विद्यार्थ्यांना अनेक वर्षांचा त्रास आहे. त्यात वाहतूक कोंडीही नित्याचाच भाग आहे. त्याला पर्याय म्हणून दहा वर्षांपूर्वी वातानुकूलित भाजी मंडईचे स्वप्न बीडकरांना दाखविले. मात्र, पाच वर्षांपूर्वी उभारलेली इमारतीचा लघुशंकेसाठी वापर होतोय. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचाही त्रास सहन करावा लागत आहे. सत्ताधारी कोणी नाही, पुढारी म्हणणारे गप्प आहेत आणि प्रशासनाला काही देणे घेणे नाही.
सध्या असलेल्या भाजी मंडईत दोन शाळा आहेत. फळे व भाज्यांची गाडे रस्त्यावर लावलेली असल्यामुळे शाळेला सायकलीवरून येता - जाताना विद्यार्थ्यांच्या नाकी नऊ येतात. सकाळी तासभर आणि दुपारी तासभर ही कोंडी कायम असते. एरव्ही ये - जा करणारे आणि भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांसाठी या भागात पार्किंग सुविधा नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून भाजी मंडई स्थलांतराची मागणी आहे. या मागणीवरून शहरात वातानुकूलित भाजी मंडईचे आश्वासनवजा स्वप्न बीडकरांना दहा वर्षांपूर्वी दाखविण्यात आले.
सुभाष रोडच्या उत्तरेला सिद्धिविनायक संकुल भागात यासाठी भव्य दोन मजली इमारतही बांधण्यात आली. इमारतीमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी आधुनिक ओटेही बांधलेले आहेत. मात्र, विद्युतीकरण व वातानुकूलित यंत्रणेचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून इमारतीचा परिसर लघुशंकेसाठी वापरला जात आहे.
प्रश्न कायम
सिद्धिविनायक संकुल भागातील व्यावसायिकांसह येणाऱ्या - जाणाऱ्यांना या दुर्गंधीचा मोठा त्रास होत आहे. आश्वासनानंतर पालिकेच्या दोन टर्मही संपल्या असून आता नव्याने पालिकेवर सत्तेसाठी सर्वांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, कोट्यवधी खर्च करून इमारत उभारून नेमके ठेकेदाराचे हित तर साधले पण बीडकरांना व विक्रेत्यांना वातानुकूलित भाजी मंडई कधी? असा प्रश्न कायम आहे.