जून संपला तरी जिल्ह्यात ९१६ टॅंकर सुरू

जालिंदर धांडे
सोमवार, 1 जुलै 2019

जिल्ह्यातील चारा छावण्या झाल्या कमी
मेमध्ये जिल्ह्यात ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या. यामध्ये चार लाख ३९ हजार ८९ पशुधन होते. जूनपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतीकामासाठी जनावरे घरी नेली आहेत. अजूनही जिल्ह्यातील पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही तरीही शेतकऱ्यांनी शेतातील कामांसाठी पशुधन घरी नेले आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात फक्त ९२ चारा छावण्या सुरू असून त्यात ४४ हजार ७४१ पशुधन आहे.

बीड - जिल्ह्यात मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे काही प्रमाणात दुष्काळापासून दिलासा मिळाला आहे; परंतु जून महिना संपला तरी जिल्ह्यात ९१६ टॅंकरने एक हजार १६५ गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शेतातील कामे सुरू केल्याने शेतकऱ्यांनी चारा छावणीतून जनावरे घरी नेली असून सध्या जिल्ह्यातील ९३३ चारा छावण्यांपैकी फक्त ९२ चारा छावण्या सुरू आहेत. पशुधनाच्या पाण्याचा काही प्रमाणात प्रश्न मिटला असला, तरी चाऱ्याचा प्रश्न अजूनही भेडसावत आहे.

जिल्ह्यात गेल्या मॉन्सूनमध्ये सरासरीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला होता. यामुळे वर्षभर दुष्काळाचा सामना करावा लागला होता. काही तालुक्‍यात गेल्या आठवड्यापासून चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सध्या सर्वत्र शेतातील कामात शेतकरी मग्न झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ९३३ चारा छावण्या सुरू केल्या होत्या; परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यामुळे अनेकांनी आपापली जनावरे घरी नेली आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील ९३३ पैकी फक्त ९२ चारा छावण्या सुरू आहेत. यामध्ये ४४ हजार, ७४१ जनावरे आहेत. शेतातील कामासाठी शेतकऱ्यांनी छावणीतून जनावरे नेण्यास सुरवात केली आहे. जून महिना संपला तरी अजून जिल्ह्यात कुठे समाधान, तर कुठे समस्या दिसून येत आहेत. यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासीयांना लागली आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत ६६ टॅंकर घटले
जून संपला तरी ९१६ टॅंकरद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलेन जिल्ह्यात ६६ टॅंकर कमी झाले आहेत. अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत काही प्रमाणात वाढ झाली आहे. पूर्वी प्रकल्पात ०.४५ टक्के पाणीसाठा होत्या. त्यात बदल होऊन सध्या ०.५४ झाला आहे. सध्या मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

मागील आठवड्यातील पाणीसाठा - ०.४५ टक्के
सात प्रकल्पांत - २५ टक्के
सध्याचा पाणीसाठा - ०.५४ टक्के
दोन प्रकल्पांत - २५-५० टक्के


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed District 916 Water Tanker Water Shortage Rain