Mahavitaran electricity bill
sakal
नितीन चव्हाण
बीड : महिनाभर काटकसरीने घर चालवायचे, महागाईशी दोन हात करायचे आणि अचानक हातात २०-३० हजार रुपयांचे वीजबिल पडायचे... हे बिल पाहून घाम फुटणार नाही तर काय होईल? बीड शहरातील वीज ग्राहकांच्या मनात सध्या हाच संताप आणि भीती दाटून आली आहे. बीड शहरातील महावितरणचा कारभार म्हणजे जणू ‘लुटीचा धंदा’ बनला असून, चुकीच्या मीटर रीडिंगमुळे घरगुती ग्राहकांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा टाकला जात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
शहरातील पेठ भागातील असो वा उपनगरातील, प्रत्येक गल्लीत आज एकाच विषयाची चर्चा आहे - महावितरणचे अव्वाच्या सव्वा वीजबिल. कालपर्यंत ज्या घराचे बिल ८०० ते १,२०० रुपयांच्या घरात असायचे, आज त्याच घराबाहेर ५ ते ६ हजारांपासून थेट ७० हजार रुपयांपर्यंतची बिलं चिकटवण्यात आली आहेत. आम्ही वीज वापरतो की सोन्याचे दागिने बनवतो? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. काही ग्राहकांच्या बाबतीत तर प्रत्यक्ष वापराच्या दहापट अधिक बिल आकारण्यात आले आहे. हे केवळ तांत्रिक बिघाड नसून महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस आहे.