Beed : डोंगर भागातील पिके माना टाकू लागली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed farmer Kharif Crops sowing hill area need rain

Beed : डोंगर भागातील पिके माना टाकू लागली

किल्लेधारूर : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुरुवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप पेरणी उशिरा झाली. तालुक्यात कापूस व सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८५ टक्के क्षेत्र कापसाने व सोयाबीनने व्यापले आहे.

पेरणी झाली अन् लागलीच संतत धारेमुळे कोवळी पिके पिवळे पडू लागली होती. यामुळे काही भागांतील पिकांची वाढ खुंटली. कशीबशी शेतकऱ्यांनी मेहनतीने ही पिके तालावर आणली. मात्र तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने डोंगर भागातील हलक्या जमिनीवरील पिके माना टाकू लागली आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यातील धारूर, कासारी बोडका, घागरवाडा, बांगरवाडी, महिंदवाडी भागातील पिके पावसाअभावी संकटात सापडलेली आहेत. जूनच्या सुरुवातीला पाऊस उशिरा झाल्याने खरीप हंगामास विलंब झाला. दरम्यान तालुक्यात गोगलगायींच्या प्रादुर्भावाने सोयाबीनचे काही ठिकाणी नुकसान झाले. शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून आजवर खरीप पिकांवर मोठ्या प्रमाणात आंतरमशागतीसह फवारणीसाठी खर्च केला आहे.

मात्र आता शेवटच्या टप्प्यात पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भिती वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. कधीतरी अधूनमधून पावसाच्या बारीक सरी कोसळतात पण त्याचा फार काही उपयोग होत नाही. उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. मशागतीमुळे शेतातील वरचा थर मोकळा होऊन खाली असलेला थोडा फार असलेला ओलावाही बऱ्याच भागात नष्ट झाला आहे.

त्यामुळे पिकांना पावसाची नितांत गरज आहे. ज्यांच्याकडे सिंचनाचा पर्याय आहे असे शेतकरी आलटून-पालटून सिंचनाने पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातही वीज ये-जा करत असल्याने अडचणी येत आहेत. मात्र ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांची पिके माना टाकत आहेत.

पावसाअभावी डोंगर भागातील व हलक्या जमिनीवरील सोयाबीन, मूग, उडीद ही पिके काही प्रमाणात सुकत आहेत. यावर तात्पुरता उपाय म्हणून शेतकऱ्यांनी तेरा झिरो पन्नास या खताची फवारणी करावी. जेणेकरून काही दिवस पिके तग धरतील.

-शरद शिनगारे, तालुका कृषी अधिकारी

सोयाबीनची पेरणी करून आजवर अडीच महिन्यांचा कालावधी लोटला गेला आहे. मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. सध्या काही भाग जोमात आहे तर हलक्या भागावरील सोयाबीन सुकत आहे. चार-आठ दिवसांत पाऊस नाही आला तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

- विनायक शिनगारे, शेतकरी

मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने माझ्या शेतातील सोयाबीन, मुगाची पिके माना टाकत आहेत. काही क्षेत्र सिंचनाखाली येत असल्याने पाणी सुरू केले आहे. कोरडवाहू जमिनीवरील सोयाबीनला चार-पाच दिवसांत पाऊस गरजेचा आहे. अन्यथा मोठे नुकसान होईल.

- राजू किरपणे, शेतकरी

Web Title: Beed Farmer Kharif Crops Sowing Hill Area Need Rain Cotton Soybean

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..