
आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडला आहे. तीन दिवसांत बिबट्याने सुरुडी व किन्ही येथे दोन बळी घेतले. मंगळवारी सुरुडीत तरुण शेतकरी, तर शुक्रवारी किन्हीत दहावर्षीय बालक बिबट्याचे शिकार ठरले.
आष्टी ( जिल्हा बीड) ः आष्टी तालुक्यात तीन दिवसांच्या अंतरात दोन बळी घेणार्या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने परिसरातील ग्रामस्थांची झोप उडालेली आहे. अशा स्थितीत या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आलेल्या वन अधिकार्यांनी मात्र विश्रांतीसाठी घटनास्थळापासून दूर असलेल्या आष्टी शहराची निवड केली आहे. यासाठी एका हॉटेलमध्ये शनिवार (ता. २८) आठ खोल्या बुक करण्यात आल्या असून, अधिकार्यांची रंगलेली ‘ओली पार्टी’ आष्टीकरांच्या नजरेतून सुटली नाही.
आष्टी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने उच्छाद मांडला आहे. तीन दिवसांत बिबट्याने सुरुडी व किन्ही येथे दोन बळी घेतले. मंगळवारी सुरुडीत तरुण शेतकरी, तर शुक्रवारी किन्हीत दहावर्षीय बालक बिबट्याचे शिकार ठरले. शिवाय आजही (शनिवार) आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे माय-लेकावर बिबट्याने हल्ला केला. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. या घटनांमुळे परिसरासह सर्व तालुक्यातच दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी सुमारे वीस तज्ज्ञांचे पथक, तसेच शंभर-सव्वाशे वन अधिकारी-कर्मचार्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काल सायंकाळपासून बिबट्याच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहेे. बिबट्याच्या दहशतीने ग्रस्त परिसरातील नागरिक रात्र-रात्र जागून काढत आहेत. स्वयंसेवक बनून परिसराची माहिती देत आहेत. मशाली घेऊन ग्रामस्थ बिबट्याचा रात्र-रात्र शोध घेत आहेत. परंतु बिबट्याचा शोध अद्याप लागलेला नाही. यातच पथकातील काही वन अधिकारी-कर्मचार्यांकडून बेजबाबदारपणा होत असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - युपीएससी प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशासाठीही सीईटी, राज्यातील सहा केंद्रांमध्ये एकच फॉर्म्युला -
बिबट्याचा उपद्रव असलेल्या ठिकाणी राहून ग्रामस्थांना धीर देत मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना अनेक अधिकारी-कर्मचारी तेथून सुमारे बारा-पंधरा किलोमीटरवर असलेल्या आष्टी येथे मुक्कामास आले आहेत. यात वरिष्ठ अधिकार्यांचा भरणा असल्याची माहिती समजली. त्यांच्यासाठी शहरातील एका लॉजमध्ये आठ खोल्या बुक करण्यात आल्या असून, चार-पाच वाहनांतून हा फौजफाटा आष्टी मुक्कामी रात्री दाखल झाला. एका वाहनावरील लाल दिवा व इतर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेली वाहने लक्ष वेधून घेत आहेत. लॉजशेजारील हॉटेलमध्ये काहींची रंगलेली ‘ओली पार्टी’ आष्टीकरांच्या नजरेतून सुटली नाही. त्याची जोरदार चर्चा आष्टीत होत आहे.
मुक्काम ‘ऑन द स्पॉट’च हवा
नरभक्षक बिबट्याच्या दहशतीने निर्माण झालेली स्थिती पाहता सर्व तज्ज्ञ, अधिकारी व कर्मचार्यांनी मोहीम पूर्ण होईपर्यंत ‘ऑन द स्पॉट’ असणे अपेक्षित आहे. काल (शुक्रवार) रात्री आमदार सुरेश धस उशिरापर्यंत या मोहिमेत सहभागी होते. पथकाला लागेल ते सहकार्य करण्याची ग्रामस्थांची तयारी आहे. अशा वेळी मुक्कामाची व्यवस्था गावात सहज होऊ शकते. तसेच जेवणाची व्यवस्था झाली नाही तरी पार्सलची सुविधा आहेच. परंतु हे सर्व टाळून दूरवर येऊन विश्राम आणि त्यातही ओली पार्टी करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे.
आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे बिबट्याने हल्ला केल्याने या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काही अधिकारी-कर्मचारी आष्टीत आलेले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आष्टीत करण्यात आली. लॉजच्या खालीच हॉटेल असल्याने सर्वजण जेवायला गेले होते.
- श्याम शिरसाट, वन परिक्षेत्र अधिकारी, आष्टी.
संपादन- प्रल्हाद कांबळे
|