बालविवाह रोखण्यासाठी ‘ती’ यात्रेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed girl join bharat jodo Yatra to prevent child marriage nanded

बालविवाह रोखण्यासाठी ‘ती’ यात्रेत

पार्डी, (जि. नांदेड) : ‘मी लहान असताना आणि खूप शिकायची इच्छा असताना माझ्या मामांनी माझा विवाह निश्चित केला. अनेकदा विनवण्या करूनही माझे कोणी ऐकले नाही. तेव्हा मी धाडसाने आणि ‘लेक लाडकी’ संस्थेच्या मदतीने लग्न रोखले. पण माझ्या जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. राज्यात आणि देशातही अशीच स्थिती आहे. याच विषयावर मला राहुल गांधी यांच्यासोबत बोलायचे आहे,’ असे सतरा वर्षीय सारिका पाखरे (रा. मानूर, जि. बीड) सांगत होती.

नांदेडजवळील दाभड येथून शुक्रवारी सकाळी सातला भारत जोडो यात्रा सुरू झाली. यात्रेत सातारा येथील ‘लेक लाडकी’ संस्थेच्या प्रमुख वर्षा देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्य सारिकासोबत चालत होते. एकता, अखंडता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या बॅनरचे जॅकेट घालून ते चालत आहेत. महाराष्ट्रात पुढील नऊ दिवस ते यात्रेत सहभागी असतील.

ग्रामीण भागात हव्यात रोजगाराच्या संधी

‘आमचा भाग दुष्काळी, त्यामुळे ऊसतोड कामगार जास्त. उसतोडीला जाताना सोबत मुलींना घेऊन न जाता त्यांचे कोवळ्या वयात लग्न करून आईबाप रिकामे होतात,’ अशी व्यथा सारिका व्याकुळतेने मांडत होती. माझ्याप्रमाणेच माझ्या दोन मैत्रिणींचे बालविवाह सुद्धा मी रोखले आहेत. पण ही प्रथा कायमस्वरूपी रोखण्यासाठी ग्रामीण भागात रोजगाराची गरज आहे. ही माझीच नव्हे हजारो लेकींची व्यथा आहे. ती राहुल गांधींना सांगणार आहे’, असे सारिका म्हणाली.

केवळ दोन‌ मिनिटांची कोपरा सभा

वारंगा फाटा (जि.हिंगोली) : येथे शुक्रवारी (ता.११) सायंकाळी कोपरा सभा झाली. राहुल गांधी यांना ऐकण्यासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. पण, राहुल यांनी केवळ दोन मिनिटच बोलले. यावेळी त्यांनी यात्रेचा उद्देश सांगत ‘‘राजीव सातव आज आपल्यात नाहीत. त्यांची आठवण येतेय’’, असे ते म्हणाले. फटाक्यांच्या आतषबाजीत राहुल यांचे स्वागत करण्यात आले.