

Beed Heatwave News
esakal
बीड: घड्याळाचा काटा सकाळी ११ वर पोचतो न पोचतो तोच, आकाशातून जणू आगीच्या ज्वाळा अंगावर पडत असल्याचे भासू लागले आहे. मागच्या वर्षी पावसाने मनसोक्त हजेरी लावली. पण आता उन्हाळा मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच रुद्रावतार धारण करू लागला आहे. अंगाची लाहीलाही करणारी उष्णता, कोरडा पडणारा घसा आणि दुपारच्या वेळी रस्त्यांवर पसरलेली भयाण शांतता हे आजच्या बीड जिल्ह्याचे वास्तव आहे. मार्चमध्येच जिल्ह्याचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकल्याने जनजीवन विस्कळित झाले असून, भविष्यातील कडक उन्हाळ्याची ही केवळ एक झलक मानली जात आहे.