Beed : केज तालुक्यातील १९ वस्तीशाळा इमारतीविना

२६ प्राथमिक शाळेच्या इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
vasti school
vasti school

केज : शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा अट्टहास केला जातो. मात्र तालुक्यातील १९ वस्तीशाळा या इमारतीविना तर २६ प्राथमिक शाळांच्या इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्याचबरोबर उर्दू माध्यमाच्या शाळांना स्वतंत्र इमारत नसल्याने मराठी माध्यमाच्या शाळेच्या इमारतीचा आधार घ्यावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व शिक्षण विभागाचे मागील नऊ-दहा वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे सर्व सोयीयुक्त इमारती व सजविलेल्या वर्ग खोल्यांचे स्वप्न कधी पूर्णत्वास येईल? असा प्रश्न पालकांतून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १९ शासकीय वस्तीशाळा इमारत नसल्याने बिनभिंतीच्या आहेत. शाळेला एकही वर्ग खोलीच नसल्याने या शाळा झाडाखाली, मंदिराच्या ओट्यावर, जनावरांच्या रिकाम्या गोठ्यात, चवाळे बांधून तात्पुरत्या तयार केलेल्या झोपडीच्या निवाऱ्याखाली भरवल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसांत तात्पुरता निवारा केलेल्या वर्गखोल्या गळत असल्याने शाळेला सुट्टी दिल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशातील ग्रामीण भागातील शाळांची इमारत नसल्याने बिकट अवस्था आहे.

सहाजिकच याठिकाणी कार्यरत शिक्षकांना अध्यापन कसे करावे तर विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत ज्ञान ग्रहण कसे करावे? असा प्रश्न सतावत आहे. यामुळे देशाच्या उद्याच्या भविष्याचा शिक्षणाचा अधिकार, शासनाच्या उदासीन धोरणामुळे हिरावून घेतल्यासारखे चित्र दिसून येत आहे. मागील अनेक वर्षांपासून तालुक्यातील लोकप्रतिनिधींना जिल्हा परिषदेत शिक्षण व बांधकाम विभागाच्या सभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली.

त्या काळातही तालुक्यातील इमारत नसलेल्या शाळांच्या इमारत बांधकामासाठी लागणारा निधी मंजूर करता आला नाही ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची परवड विचारात घेऊन इमारतीविना दुर्लक्षित असलेल्या वस्तीशाळांच्या नवीन इमारत बांधकाम व नादुरुस्त इमारतींच्या दुरुस्ती मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थी व पालकांतून केली जात आहे.

इमारत नसलेल्या वस्तीशाळा

विठ्ठल वस्ती, हनुमान वस्ती तुकूचिवाडी, पिंपळशेत वस्ती, धनगेवस्ती, विठ्ठलनगर वस्ती, चिंचकर वस्ती, एडके वस्ती, गदळे वस्ती, मेटे वस्ती, गजानन नगर, चिंचोलीमाळी वस्ती (उर्दू), यमाई वस्ती, गोपाळ वस्ती, लहुरी वस्ती (उर्दू), मांगदरा वस्ती, घाटेवस्ती, भालगाव नं १( उर्दू), सुरजितदरा वस्ती हनुमान वस्ती, जीवाचिवाडी या वस्ती शाळांचा इमारत नाही. टॅब, स्क्रीनवर चलचित्राद्वारे अभ्यासक्रम, सर्व सोयी-सुविधायुक्त शहरातील व इतर ठिकाणच्या इमारती, शैक्षणिक साहित्याने सजविलेल्या वर्ग खोल्या व बोलक्या भिंती पाहून ग्रामीण भागात वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशी माझी शाळा का नाही? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

या वस्तीशाळा इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व सर्वशिक्षा अभियानांतर्गत निधी उपलब्ध होत नाही. इमारत बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडे (डीपीटीसी) निधीची मागणी करण्यात आलेली आहे.

-सुनील केंद्रे, गटशिक्षणाधिकारी, केज

दरवर्षी शाळेला इमारत नसल्याची माहिती आमच्याकडून मागविली जाते. अनेकवेळा माहिती पाठवूनही निधी मिळत नसल्याने आम्हाला उघड्यावर शाळा भरवावी लागते.

-किशोर भालेराव, सहशिक्षक, सुरजितदरा वस्तीशाळा, ता. केज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com