
गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर विरोधात अनेक तक्रारी आलेल्या आहेत.
परळी वैजनाथ (बीड): येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर यांच्या विरोधात कर्मचारी तंत्रज्ञ गोपाळ काकडे यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे जिवीतास धोका असल्याची तक्रार केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर विरोधात अनेक तक्रारी आलेल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने विजबील वसूली मोहीम सुरू करण्यात आली आहे. येथे मात्र वीजबिल वसूलीच्या नावाखाली व्यापारी, राजकारणी लोकांचे विजबील पेंडींग असताना दिवसा विज खंडित करण्यात येते. रात्री श्री.आंबाडकर दुसऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ही खंडित केलेली विज पुन्हा जोडून देण्यात येते. यापाठीमागे मोठे अर्थकारण दडल्याची चर्चा येथे सुरू आहे.
आता तर थेट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात सहाय्यक अभियंत्याकडे लेखी तक्रार केली आहे. तक्रारी मध्ये म्हटले आहे की, आमच्या कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर माझा सतत मानसिक छळ करुन जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. त्यांच्या तोंडी व लेखी आदेशानुसार माझ्या कार्यक्षेत्रात दिलेल्या थकबाकीची वसूली प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या कार्यक्षेत्रात एका ग्राहकाकडे पाच लाखाच्या वर थकबाकी असल्याने त्यांच्या आदेशानुसार वीज खंडित केली.
पण श्री.आंबाडकर यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच दिवशी दुसऱ्या कर्मचाऱ्याला बोलावून खंडित केलेली विज जोडून दिली. विशेष म्हणजे या ग्राहकाने विजबील थकबाकी भरलेली नाही. या घटनेची वरिष्टांना माहिती दिल्याने श्री.आंबाडकरांनी मला धमकी दिली आहे. यामुळे माझ्या जिवीतास धोका असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्यासाठी लेखी तक्रार करत आहे. असे गोपाळ काकडे यांनी वरिष्ठांना दिलेल्या तक्रारी मध्ये सांगितले आहे. याची प्रत तहसीलदार, अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना पाठवण्यात आली आहे.
येथील उपकार्यकारी अभियंता प्रशांत आंबाडकर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यभाराची चर्चा होत आहे. विजवितरण कंपनीच्या नियमानुसार रात्री शहर व परिसरात काही बिघाड झाला तरच विजपुरवठा बंद करण्याचे दुरुस्तीसाठी परमिट घेता येते. पण उपकार्यकारी अभियंता यांनी गेल्या काही दिवसात कोणत्याही वेळेस फोनवरून वीजपुरवठा बंद करण्याचे परमिट घेतले आहे. असे एक नाही अनेक प्रकरणे सध्या शहरात चर्चेले जात आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी येथे होत आहे.