esakal | धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक
sakal

बोलून बातमी शोधा

beed incident

धक्कादायक! एकाच रुग्णवाहिकेतून २२ मृतदेहांची वाहतूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंबाजोगाई (बीड): येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या बावीस जणांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याचा प्रकार रविवारी (ता.२५) उघडकीस आला. मृतदेहांची अवहेलना होत असल्याबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक झाली. यामुळे रुग्णालय प्रशासनाला कोरोनाला आवर घालायचा आहे की संसर्ग वाढवायचा आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेजारच्या तालुक्यातील कोरोना रूग्ण मोठ्या प्रमाणात येथे येतात. जास्त वय, अन्य आजार, त्यातच कोरोनाची लागण झाल्याने गंभीर झालेल्या तीस जणांचा गेल्या शनिवार व रविवार मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालय ते मांडवा मार्गावरील पालिकेची स्मशानभूमी हे अंतर आठ किलोमीटर आहे. रुग्णवाहिकेची कमतरता असल्याने २२ मृतदेह एकाच रुग्णवाहिकेत भरून स्मशानभूमीत नेण्यात आले.

पाच रुग्णवाहिकांची मागणी, पण…
याबाबत रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ . शिवाजी सुक्रे म्हणाले, जिल्हा प्रशासनाकडे पाच रुग्णवाहिकांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी अधिग्रहीत केलेल्या दोन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यापुढे मृतदेह रुग्णवाहिकेतून नेताना असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. दरम्यान, आता मृतदेहांवर त्वरित अंत्यसंस्कार केले जातील, असे उपजिल्हाधिकारी शरद झाडके म्हणाले.

loading image