Beed : अखेर मातोश्री पतसंस्थेचे उघडले टाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Matoshree Patsanstha Depositors Director Board

Beed : अखेर मातोश्री पतसंस्थेचे उघडले टाळे

बीड : दोन महिन्यांपासून टाळे असलेल्या मातोश्री पतसंस्थेचा गुरुवारी (ता. २५) त्रिसदस्यीय प्रशासक मंडळाने पदभार घेतला. प्रशासक मंडळाने बंद पतसंस्थेचे टाळे उघडल्यानंतर ठेवीदारांची एकच झुंबड उडाली. मात्र, अद्यापही पतसंस्थेचे कागदपत्र हाती लागले नसल्याची माहिती आहे.

येथील सिद्धिविनायक संकुलाच्या पहिल्या मजल्यावर काही महिन्यांपूर्वी मातोश्री पतसंस्था सुरु झाली. अनेकांनी यात ठेवी गुंतविल्या आहेत. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस अचानक पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाला टाळे लागल्याने ठेवीदारांमध्ये घबराहट झाली. काही दिवस वाट पाहून ठेवीदारांनी पोलिस अधीक्षक, शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. नंतर सहकार खात्याचेही दरवाजे ठोठावले. मात्र, हा विषय अफरातफरीचा की सहकाराचा यात ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’चा प्रत्यय आला.

या दोन महिन्यांच्या काळात पतसंस्थेला टाळे, पतसंस्थेच्या प्रमुखांसह कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा नाही यामुळे ठेवीदारांमध्ये भितीचे वातावरण आहे. दरम्यान, तालुका सहनिबंधक गोपाळकृष्ण परदेशी यांनी या पतसंस्थेवर त्रिसदस्यीय प्रशासक मंडळ नेमले आहे. यात लेखा परीक्षक गणेश क्षीरसागर, सहकार अधिकारी एस. एल. बेटकर, सहकार विभागाचे एस. बी. जाधव यांचा समावेश आहे. या तिघांनी गुरुवारी सुरुवातीला कायदेशीर प्रक्रिया करत पतसंस्थेचे कार्यालय उघडून पदभार घेतला. काही तरी हाती मिळेल या आशेने शेकडो ठेवीदारांनी यावेळी गर्दी केली. मात्र, प्रशासकांना कागदपत्रेच मिळाली नाहीत तर ठेवीदारांचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न आहे. दरम्यान, आम्ही फक्त पदभार घेतला असून कागदपत्रांची व व्यवहारांची तपासणी सोमवारपासून करणार असल्याचे गणेश क्षीरसागर यांनी सांगितले.

ठेवीदार हवालदिल

पतसंस्थेचे ठेवीदार दोन महिन्यांपासून हवालदिल आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांनी या पतसंस्थेत ठेवी ठेवलेल्या आहेत. आता प्रशासक मंडळ ठेवीदारांच्या अपेक्षांची किती पुर्तता करते याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Beed Matoshree Patsanstha Depositors Director Board

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BeedAhmednagar