परळीत वीज कंपनी देतेय ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’

लक्ष्मण वाकडे
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

पंकजा मुंडे-पालवे म्हणतात... 
वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडून परळीतील ग्राहकांना गेल्या वर्षापासून वीजबिलाचे वाटप होत नाही. यामुळे ग्राहकांवर दंड व व्याजाचा भुर्दंड पडला आहे. तो कमी करून वीजबिलात सूट देण्याबाबत व वीज देयके नियमित देण्याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

परळी वैजनाथ - गेल्या दीड वर्षापासून शहर व परिसरात वीजबिल देयके न वाटल्यामुळे ग्राहकांकडे थकबाकी वाढली आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडण्याची धडक मोहीम वीज वितरण कंपनीने सुरू केली आहे. या प्रकारामुळे परळीतील वीज ग्राहक संतप्त झाले आहेत.

वीजबिलाचे वितरण न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी सर्वसामान्य ग्राहकांनाच वीज वितरण कंपनीने वेठीस धरल्यामुळे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य ग्राहकांतून व्यक्त होत आहे. 

शहर व परिसरात वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या तारखेच्या आत कधीच देयके मिळत नाहीत. आता तर दीड वर्षापासून शहरात वीज देयके देणे व मीटरवरील रीडिंग घेणे बंदच झाले आहे. शहरात वीज वितरण कंपनीचे २३ हजार ५७२ ग्राहक आहेत. तर व्यापारी, शासकीय कार्यालय, पाणीपुरवठा, नगरपालिका व औद्योगिक वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या तीन हजार आहे. ऑगस्ट २०१७ पर्यंत तालुक्‍यात वीज ग्राहकांकडे एकूण थकबाकी साठ कोटी ८९ लाख ५३ हजार २०७ एवढी आहे. देयके ग्राहकांना न मिळाल्यामुळे थकबाकी वाढली आहे. दर महिन्याला विलंब शुल्काचा दंड व थकबाकीचे व्याज ग्राहकांच्या वीजबिलात टाकले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासूनचा दंड व व्याजाची रक्कम ग्राहकांना भरण्याची वेळ कंपनीने आणून ठेवली आहे. त्यात वीज खंडित करण्यासाठी बाहेरून कर्मचाऱ्यांचे पथक बोलावून घेतले आहे. 

गेल्या चार दिवसांत अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना दिली गेलेली नाही. वीजबिलाची देयके न दिल्यामुळे त्यास जबाबदार धरून वीज वितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयातील अधिकाऱ्यांवर अगोदर कारवाई करावी, दंड व व्याजाचा भुर्दंड त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी सर्वसामान्य ग्राहक येथे करीत आहेत. 

अधिकारी म्हणतात..
वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधला असता ग्राहकांनी दीड वर्षापासून वीज वापरली आहे. त्याचे बिल त्यांना भरावेच लागणार, दंड व व्याजही भरावे लागणार असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. वीजबिलाचे वाटप का झाले नाही, यामुळे दंड व व्याजाचा भुर्दंड ग्राहकांवर पडला आहे हे मात्र अधिकाऱ्यांनी बोलण्यास टाळले.

Web Title: beed news MSEB pankaja palwe Electricity bill