Beed बाधित क्षेत्रातील उत्पादनात होऊ शकते ५० टक्के घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crop damage

परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान

Beed : बाधित क्षेत्रातील उत्पादनात होऊ शकते ५० टक्के घट

अंबाजोगाई : पेरणी होताच गोगलगाय, त्यानंतर काही काळ पावसाची ओढ, त्यातून जीवदान मिळताच यलो मोझॅक. आता काढणीला येताच परतीच्या पावसाचे संकट या सर्व कचाट्यात शेती अडकली आहे. यंदाच्या पावसानेही शंभरी ओलांडली असून सरासरी (७००) मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तालुक्यात या बाधीत झालेल्या क्षेत्रावर खरिपाच्या पिकात ५० ते ६० टक्के घट येणार आहे.

अशा अवस्थेत शेतकऱ्याने कसा उदरनिर्वाह करायचा? हातात आलेले पीक निसर्ग हिरावून नेत आहे. अतिपावसाने पाण्याची सोय झाली, तर पिकांवर संकट येते. शेतात पिकलेच नाही तर खायचे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. या ऑक्टोबर महिन्यात १३ दिवसात अंबाजोगाई तालुक्यात सरासरी ७९ मिलिमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस बर्दापुर महसूल मंडळात झाला आहे. ता. ९ ऑक्टोबर रोजी बर्दापुर मंडळात ४७.५ मिलिमीटर व ता.११ ऑक्टोबर रोजी ४३ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.

तालुक्यात अतिवृष्टीची नोंद नसली तरी, बऱ्याच गावच्या शिवारांत जोरदार पाऊस झाल्याने, सोयाबीनच्या पिकात पाणी साचलेले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले सोयाबीनही पाण्यात आहे.

नुकसानीची आकडेवारी अद्याप नाही

ज्यांच्या उभ्या पिकात किंवा शेतात काढून ठेवलेल्या पिकांत, जर पाणी असेल तर ७२ तासाच्या आत विमा कंपनीस फार्ममित्र या ॲपवर कळवावे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित गावचे कृषी सहाय्यक किंवा कृषी विभागास संपर्क करावा करावा असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी केले आहे.

या पावसाने किती क्षेत्राचे नुकसान झाले याची आकडेवारी अद्याप गोळा झालेली नाही. प्रादुर्भावाने बाधित झालेल्या क्षेत्रातील सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मात्र ५० ते ६० टक्के घट येऊ शकते असा अंदाजही श्री. वडखेलकर यांनी व्यक्त केला आहे.

असा झाला पाऊस

अंबाजोगाई तालुक्यातील विविध महसूल मंडळात जून ते ऑक्टोबर या कालावधीत झालेला पाऊस पुढील प्रमाणे (मिलीमीटर) : अंबाजोगाई (७०३.२), पाटोदा (७६८.३), लोखंडीसावरगाव(७४९.७), बर्दापुर (८३६), घाटनांदूर (७०४.२). तालुक्यातील पावसाची वार्षिक सरासरी ६६३.२ इतकी आहे. परंतु यंदा १३ ऑक्टोबरपर्यंत तालुक्यात सरासरी ७५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याची टक्केवारी ११३.५ आहे. म्हणजेच पावसाने शंभरी ओलांडली आहे.

या गावात मोठे नुकसान

तालुक्यातील उजनी, पट्टीवडगाव, पूस या भागातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने याची पाहणी करून नुकसानीची नोंद घेणे गरजेचे आहे. बुधवारी झालेल्या पावसाने कातकरवाडी (ता.अंबाजोगाई) येथील शेतकरी यशवंतराव विश्वनाथ गायकवाड यांच्यासह इतर काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या सोयाबीनच्या पिकात पाणी साचले होते.