'कोरोनाकाळात सीसीटीव्ही खरेदीत भ्रष्टाचार' आमदार नमिता मुंदडांचा नियोजन समितीच्या बैठकीत गंभीर आरोप

namita m
namita m

बीड: कोरोना संसर्गाच्या काळात लोकांच्या भीतीचा बाजार मांडून प्रशासनातील अधिकारी व ठेकेदारांनी खिशे भरल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे. निधीतून औषधी आणि उपचार सामग्रीऐवजी रंगरंगोट्या, दुरुस्त्या, सीसीटीव्ही असे ठेकेदारांचे खिशे भरण्याचे काम झाले. मतदार संघातील दवाखान्यांत सीसीटीव्ही बसविण्यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

मंगळवारी (ता. दोन) जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीतही नमिता मुंदडा यांनी हा मुद्दा मांडून चौकशीची मागणी केली आहे. याबाबत विधिमंडळातही आवाज उठविणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव सुरु झाला. या हाहाकाराने सर्वच घटक भीतीच्या सावटाखाली गेले. मात्र, या काळात काही राजकीय पदाधिकारी व ठेकेदार यांनी शासनाच्या निधीवर हात मारुन घेतल्याच्या एकेक सुरसकथा आता बाहेर येऊ लागल्या आहेत. बीड जिल्ह्यात या कामासाठी साधारण ५० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. जिल्हा नियोजन समितीसह गौण खनिज, आपत्ती निवारण अशा विभागांकडूनही निधी उपलब्ध करुन देण्यात आला.

कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी सर्वाधिक महत्वाचे असलेले व्हेंटीलेटर्स तर शासनानेच पोच केले. त्याची औषधीही वरिष्ठ पातळीवरुनच आली. मात्र, उर्वरित बाबींना निधी उपलब्ध व्हावा यासाठी शासनाने सर्व कामांना हात आखडले मात्र कोरोनासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला. मात्र, उपचार सामुग्री सोडून इतर बाबींवरच निधीची उधळण आणि त्याचे दरही अवास्तव लावल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील सीसीटीव्ही बसविण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचे नमिता मुंदडा यांचा आरोप आहे.

यात केजच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई शेजारील लोखंडीला उभारलेल्या कोविड रुग्णालयातही सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. इतर रुग्णालयांतही सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र, यासाठी दाखविलेला खर्चच मुळात अवास्तव असल्याचा त्यांचा आरोप आहे. बाजार दरानुसार आणि निविदेनुसार स्पर्धेतून हे साहित्य तीन लाखांत बसावे त्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च केला.

विशेष म्हणजे तत्कालिन जिल्हा शल्यचिकीत्सकांनी याची निविदा काढली. जिल्हा शल्यचिकीत्सक हे वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान काय, एनआयसीने ही निविदा काढायला हवी असताना त्यांनी काढण्यामागे हेतू काय, असा सवालही त्यांनी केला आहे. कहर म्हणजे, कोरोना काळात बसविलेले सीसीटीव्हीच सुरु नसल्याचे समोर आले आहे. केज उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच सीसीटीव्हीच नसल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिले आहे. म्हणजे दहापट दर तर लावलाच शिवाय यंत्रणाही सुरु केली नसल्याचा नमिता मुंदडा यांचा आरोप आहे.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com