Beed : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, महसूल विभागाचीही तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

Beed : पोलिसांचा तगडा बंदोबस्त, महसूल विभागाचीही तयारी

बीड : जिल्ह्यात होत असलेल्या ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत व पारदर्शक पार पडाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. ७०४ पैकी १८५ गावे संवेदनशिल आहेत. या गावांत कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मतदानाच्या दिवशी तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, निकालाच्या दिवशीही मतमोजणी केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.

जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. दोन) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंचपदासाठी ४,२१६ तर सदस्यपदासाठी १९ हजार ८६१ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आता सोमवारी (ता. पाच) उमेदवारी अर्जांची छाननी. तर, बुधवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दरम्यान, प्रशासनाने मतदानाच्या दिवशी गावांत शांततेत प्रक्रीया पार पडावी, यासाठी नियोजन केले आहे.

पोलिस अधिक्षकांनी सर्व ठाणेदारांकडून माहिती घेतली असून, यातील १८५ गावे संवेदनशिल असल्याचे समोर आहे. या गावांत यापूर्वी निवडणुकांत भांडणाचे प्रकार झाल्याने गुन्हे नोंद आहेत. अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. आताही थेट जनतेतून सरपंचपदाची निवड असल्याने गावांतील गटांत रस्सीखेच आहे. त्यामुळे ता. १८ डिसेंबरला होणारी मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी, यासाठी सदरील गावांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

यातील काही गावांमध्ये बोगस मतदानाच्या व बूथ ताब्यात घेण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी आतापासूनच बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीला राखीव पोलिसांचा फौजफाटा पाठविण्यात येणार आहे. ता. २० डिसेंबरला तालुक्यांच्या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणीच्या ठिकाणीही पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुका पारदर्शक व शांततेत पार पडतील. महसूल व पोलिस दलाने याचे नियोजन केले होते. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस दलाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत.

- राधाबिनोद शर्मा, जिल्हाधिकारी, बीड.

निवडणुकीच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलिस दल सतर्क असून, ठाणेप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. निवडणूक असलेल्या सर्वच गावांत पोलिस बंदोबस्त असेल. संवेदनशिल गावांत अतिरिक्त कुमक ठेवण्यात येईल.

- नंदकुमार ठाकूर, पोलिस अधीक्षक, बीड.