

Beed News
esakal
बीड: कधी अस्मानी संकट, तर कधी सुलतानी जाच... बीडच्या कोरड्याठाक मातीत घाम गाळूनही पदरी काय पडणार, याची शाश्वती नसते. रात्रंदिवस कष्ट करूनही कधी निसर्ग साथ देत नाही, तर कधी बाजारभाव दगा देतात. पण याच दुष्काळी पाचवीला पूजलेल्या मातीत ध्येयवेड्या जिद्दीने एक रेशमी क्रांती आकाराला आली आहे.
तालुक्यातील कांबी येथील वशिष्ठ वासुदेव पिसाळ या प्रयोगशील शेतकऱ्याने पारंपरिक शेतीचे जुने जोखड झुगारून दिले आणि तुती रोपांच्या नर्सरीतून यशाचे असे काही शिखर गाठले की, आज त्यांच्या रोपांचा सुवास चक्क उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत पोहोचला आहे. वर्षाकाठी ३० ते ४० लाख रोपांची निर्मिती करत पिसाळ यांनी केवळ स्वतःचेच नव्हे, तर परिसरातील शेकडो कुटुंबांचे भाग्य उजळले आहे.