Beed : शेतमजुराचा मुलगा बनला राज्य करनिरीक्षक

राजेवाडीतील गणेश रेळेकर यांची अपयशातून यशाला गवसणी
beed
beedsakal

माजलगाव : आई- वडिलांचा शेतमजुरीचा व्यवसाय, जिल्हा परिषद शाळेत घेतलेले शिक्षण व डिप्लोमा करून मिळालेल्या नोकरीतून मिळत नसलेले समाधान यातून मार्ग काढत व अनेक वेळा अपयश आले तरी देखिल खचून न जाता नव्या उमेदीने उभे राहत तालुक्यातील राजेवाडी येथील गणेश रघुनाथ रेळेकर यांनी राज्य करनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. तालुक्यातील राजेवाडी येथील रघुनाथ रेळेकर हे भूमिहीन. संसाराचा गाडा चालविण्यासाठी रोज हाताला मिळेल ते शेतमजुरीचे असो किंवा कुठलेही काम करायचेआणि कुटुंबाची गुजराण करायची. जेमतेम मिळालेल्या पैशातून घर चालविणेच अवघड असायचे.

अशाही परिस्थितीत मुलगा गणेश याने शिक्षण घ्यावे, उच्चपदस्थ अधिकारी व्हावे, असे स्वप्न बाळगणारे आई- वडील नेहमी काबाडकष्ट करण्याची तयारी ठेवायचे. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत घेतल्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जय भवानी माध्यमिक विद्यालय (राजेवाडी) येथे गणेशने घेतले. परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यापेक्षा प्रिंटिंग डिप्लोमा करून नोकरी मिळविली होती. परंतु, नोकरीत मन लागत नसल्याने स्पर्धा परिक्षेची तयारी २०१५ पासून सुरू केली. या काळातच समाजशास्त्र विषयात पदवी मिळविली. अनेकवेळा यश हुलकावणी देत होते. चार वेळा पोलिस उपनिरीक्षक, टॅक्स असिस्टंट, क्लर्क अशा अनेकवेळा परिक्षा दिल्या. परंतु, अपयश पिच्छा सोडत नव्हते. अशा परिस्थितीत खचून न जाता किंवा इतर काही करण्याएैवजी जिद्दीने अभ्यास केला व राज्य करनिरीक्षक पदाला गणेश रेळेकर यांनी गवसणी घातली आहे.

२०१५ पासून २०२२ पर्यंत अनेकवेळा अनेक पदासाठी परिक्षा दिल्या. यश मिळत नव्हते. तरीदेखील निराश न होता नव्या उमेदीने अभ्यास सुरू ठेवला. औरंगाबाद, पुणे याठिकाणी तयारी सुरू ठेवली. २०२१ मध्ये झालेल्या राज्य करनिरीक्षक पदाच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये उत्तीर्ण झालो, याचा मनस्वी आनंद आहे. ग्रामिण भागातील युवकांमध्येच खरा कस आहे.

- गणेश रेळेकर, राजेवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com