Beed : झाडा- झुडपांच्या विळख्या मुळे कालवा धोक्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

beed

Beed : झाडा- झुडपांच्या विळख्या मुळे कालवा धोक्यात

जातेगाव : जायकवाडी येथील नाथ जलाशयाच्या उजवा कालव्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीचे सिमेंट गळून पडले असून, कालव्यात गाळाचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय कालव्याला झाडा- झुडपांचा विळखा पडला असल्याने कालवा धोकादायक बनत चाललेला आहे.

गेवराई तालुक्यातून गेलेल्या उजव्या कालव्यामुळे तीन- चार जिल्हा परिषद सर्कलमधील शेतशिवार हिरवे झाले आहे. असे असतानाच आता कालव्याच्या दोन्ही बाजूच्या भिंतीवर झाडं- झुडपे वाढली आहेत. कालवा देखरेखीस असलेले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षाने कालव्याचे वैभव हरवत चालले आहे.

नाथ जलाशयाचा उजवा कालवा साधारण १९८४-८५ या साली पूर्ण झाला. हा कालवा पैठणचे नाथ जलाशय ते माजलगाव धरणात सोडण्यात आलेला आहे. गेवराई तालुक्यातून नागमोडी वळणाचा जवळपास १५० किलोमीटर अंतराच्या या कालव्याने धोंडराई, तलवाडा आणि जातेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील शेतशिवार हिरवं करण्यात मदत मिळाल्याने या भागातील शेतमजूर हा ऊस बागायतदार झाला. कालव्यातून हिवाळी व उन्हाळ्यात पाणी आवर्तन येत असल्याने कालव्याखालील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा आलेख उंचीवर गेला आहे.

कालवा निर्माण होऊन साधारण तीस वर्षे उलटून गेली आहेत. आता या कालव्याकडे देखरेख करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने दोन्ही बाजूस असलेल्या भिंतीवर तसेच कालव्यात सिमेंट भिंतीवर झाडं- झुडपे मोठ्या वाढली आहेत. या शिवाय गाळ ही वाढत चालल्याने वळण ठिकाणी कालवा धोकादायक बनत चाललेला आहे. वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात यावी, अशी मागणी कालवा पट्ट्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.