बीड : मूल नसलेल्या ज्येष्ठांना ‘झेडपी’ आधार

बीड जिल्ह्यात ९६५ निराधारांना प्रशासनाचीही मदत
Beed Zilla Parishad support for childless seniors
Beed Zilla Parishad support for childless seniors
Updated on: 

बीड - मुलं आहेत, जमीन जुमलाही आहे, लेक नोकरीला आहे. पण, वृद्ध आई-बापांना सांभाळायला कोणी तयार नाही, अशी उदाहरणे सर्वत्र दिसतात. मात्र, ज्यांना मूलबाळच नाही, अशा ज्येष्ठांना आधार देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील अशा ९६५ ज्येष्ठांवर लक्ष केंद्रित करून त्यांना शासनाच्या विविध योजनांसह संस्था व सामाजिक संघटनांच्या मदतीने जीवनावश्यक वस्तू आणि आरोग्य सुविधा पुरविल्या जात आहेत.

मराठवाड्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ‘थोडेसे मायबापासाठी पण..’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी बीड जिल्हा परिषद अधिक सरसपणे पुढे आली. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ७२६ ज्येष्ठांचे सर्वेक्षण झाले. त्यांना जीवनावश्यक वस्तू, गॅस, घरकुल, कपडे, छत्र्या, आरोग्य तपासणी, नव्याने बँक खाते उघडणे, विरंगुळा कक्ष, स्वच्छतागृह असे एक लाख ३६ हजार लाभ दिल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्या नेतृत्वात श्री. सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानोबा मोकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गित्ते यांचे पथक यासाठी पुढाकर घेत आहे. तालुका व गावपातळीवर गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच व ग्रामसेवकांनीही यात मोलाचा सहभाग दिला.

निराधारांवर लक्ष

जिल्ह्यात एक लाख ७६ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासण्या करूनही त्यांना लहान मोठे लाभही देण्यात आले. मात्र, मूलबाळ नसलेले ९६५ ज्येष्ठ पाहणीत आढळले आहेत. त्यांच्यावर आता प्रशासन लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे वृद्धत्वातील विविध आजारांची अगदी खासगी दवाखान्यांत तपासणी व त्यांना मोफत औषधी देण्याचे नियोजनही केले आहे.

यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अनुराग पांगरीकर, फार्मासिस्ट असोसिएशनचे अरुण बरकसे, व्यापारी संघटनेचे संतोष सोहनी, रोटरीचे परमेश्वर जाधव आदी संघटना प्रतिनिधींसोबत बैठक झाली. या निराधारांना जिल्हा परिषद स्वतंत्र ओळखपत्र देणार आहे. ओळखपत्राच्या माध्यमातून आयएमएअंतर्गत असलेले डॉक्टर मोफत तपासण्या व उपचार करतील, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

जिल्ह्यामध्ये १,००५ विरंगुळा कक्ष

वृद्धत्वात एकलकोंडेपणा ही वृद्धांची मोठी अडचण असते. त्यामुळे वृद्धांनी एकत्र येऊन गप्पा माराव्यात, अडचणी, विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारातून जिल्ह्यात १ हजार ५ विरंगुळा कक्ष उभारले आहेत. काही ठिकाणी सार्वजनिक पार, मंदिरांसमोर सिमेंट बाकडे उभारले आहेत. सकाळी व सायंकाळी ज्येष्ठ एकत्र येतात. त्यामुळे त्यांचा विरंगुळा होतो.

या उपक्रमात निराधारांना कायम आधारासाठी पुढाकार घेणारा विभागात बीड एकमेव जिल्हा आहे. अधिकारी-कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांच्या माध्यमातून या निराधारांना मोफत उपचारासह इतर मदत व शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. आतापर्यंत केलेल्या नियोजनात संपूर्ण यश आले आहे.

- वासुदेव सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बीड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.