esakal | बीडची भाजप पुन्हा उभारी घेणार, प्रीतम मुंडे प्रदेश उपाध्यक्ष; पंकजा मुंडेंही केंद्रात जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

आता जिल्ह्यातील भाजपची मरगळ दुर होऊन जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभारी घेईल, अशी आशा आहे. मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासह इतर चार आमदार विजयी झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेची सत्ताही अनपेक्षितरीत्या भाजपने हस्तगत केली.

बीडची भाजप पुन्हा उभारी घेणार, प्रीतम मुंडे प्रदेश उपाध्यक्ष; पंकजा मुंडेंही केंद्रात जाणार

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड - खासदार प्रीतम मुंडे यांना पाच जणांमध्ये भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनाही केंद्रात (संघटना किंवा सत्ता) संधी भेटणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता जिल्ह्यातील भाजपची मरगळ दूर होऊन जिल्ह्यात पक्ष पुन्हा उभारी घेईल, अशी आशा आहे.

मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्यासह इतर चार आमदार विजयी झाले. त्यानंतर जिल्हा परिषदेची सत्ताही अनपेक्षितरीत्या भाजपने हस्तगत केली. जिल्हा बँकेसह इतर संस्थांवरही भाजपने वर्चस्व मिळविले. अगदी लातूर-उस्मानाबाद-बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीची ताकद असतानाही भाजपने राष्ट्रवादीला धूळ चारली. एकूणच त्या पाच वर्षांत भाजप अगदीच चुस्त होता; पण विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव आणि जिल्ह्यातही पाडाव झाला. सहापैकी पक्षाचे केवळ दोन आमदार विजयी झाले. या पराभवाने जिल्ह्यातील पक्षाला मरगळ लागली. पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे यांची जिल्ह्यातील कमी हजेरी हेदेखील मरगळीमागचे कारण ठरले. त्यामुळेच शक्य असलेली जिल्हा परिषदेची सत्ताही हातून गेली. पद नसले तरी जिल्ह्यात मानणारा मोठा वर्ग मुंडे भगिनींच्या पाठीशी आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या दोघी बहिणींनी जिल्ह्यात फारसे येण्याचे टाळले.

हेही वाचा - परळीत लॅबला लागली आग, लाखोंचे उपकरणे जळून खाक

पंकजा मुंडे पराभवानंतर आल्या त्या थेट लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमालाच. त्यानंतर पुन्हा एकदाच येऊन गेल्या. लॉकडाऊनमुळे त्यांना मुंबईहून येता आले नाही. प्रीतम मुंडेदेखील मुंबईत रेडझोनमध्ये राहत असल्याने त्यांना जिल्ह्यात येणे कठीण झाले. त्या मधल्या काळात आठ-नऊ दिवसांसाठी जिल्ह्यात येऊनही गेल्या. पंकजा मुंडे यांनी लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात ऊसतोड मजुरांना जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. यंत्रणेच्या माध्यमातून त्या संपर्कातही असतात आणि त्यांच्याकडून मदतही सुरू आहे. व्यक्तिगत आणि सार्वजनिक प्रश्नांवर त्यांच्याकडून यंत्रणेकडे पाठपुरावाही सुरू असतो. मात्र, या दोघी प्रत्यक्ष नसल्याने पक्षाला जिल्ह्यात बऱ्यापैकी सुस्ती आल्याचे नाकारता येणार नाही. पराभवानंतर पंकजा मुंडे यांची पक्षावरील नाराजीदेखील पक्षाला सुस्ती येण्याचे कारण आहे. त्यात पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी टाळण्यानेही समर्थकांचा संताप वाढला. अशा अनेक कारणांनी जिल्ह्यात पक्ष जरा सुस्तच आहे.

हेही वाचा - आता अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये होणार प्लाझ्मा थेरेपी उपचार

काही महिन्यांनी पुन्हा जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी पक्षाला सत्तेमुळे मिळालेली उभारी आणि दुसरीकडे भाजपची अशी अवस्था यामुळे अगदीच विषम राजकीय समीकरण जिल्ह्यात तयार झाले. राष्ट्रवादीच्या विरोधात जायला सध्या तरी जिल्ह्यात भाजपचा कोणी पुढे आलेला नाही. संघटना पातळीवर जरी काही उपक्रम सुरू असले तरी भाजप म्हणून फार दबदबा दिसत नाही. पक्षाचे नेते आपापल्या मतदारसंघात सक्रिय आहेत. मात्र, या सर्वांची एकत्रित ताकद व संघटन दिसणे गरजेचे आहे. दरम्यान, आता प्रीतम मुंडे यांना पक्षाने संघटनेत प्रदेश उपाध्यक्षपद दिले आणि पंकजा मुंडे यांना केंद्रात स्थान देण्याचे जाहीर केल्याने भाजपसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. मात्र, आता या पदांचा भाजप किती फायदा घेणार आणि पुन्हा किती जोमाने उभा राहणार हे पाहावे लागणार आहे.