भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalna

पक्षात काम करण्याची तळमळ पाहून व त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना 1985 साली भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली

भोकरदनचे माजी आमदार संतोष दसपुते यांचे निधन

भोकरदन (जालना): भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अॅड. संतोष दसपुते (वय 80) यांचे गुरुवारी (ता.26) रात्री 7 वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवारी (ता.27) सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळगावी तालुक्यातील भायडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भोकरदन शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या भायडी या छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या घरात 12 एप्रिल 1941 साली जन्मलेल्या संतोष दसपुते यांनी वकिली पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. शिक्षण सुरू असतानाच त्यांना समाजकारण व राजकारणाचे वेध लागले. घराण्याला कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी काँग्रेसमध्ये कार्यकर्ता म्हणून राजकारणात प्रवेश केला.

पक्षात काम करण्याची तळमळ पाहून व त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना 1985 साली भोकरदन-जाफ्राबाद विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेसकडून उमेदवारी दिली. या निवडणुकीत दसपुते यांनी तत्कालीन भाजपचे उमेदवार व आताचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांचा पराभव करून विधानसभा गाठली होती. पाच वर्षांच्या काळात त्यांनी मतदार संघात पक्षाला मोठी उभारी दिली होती. त्यानंतर त्यांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपदही देण्यात आले होते. याशिवाय दसपुते यांनी भोकरदन शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून तालुक्यात शिक्षणसंस्था स्थापन केली. आजही ते या संस्थेचे अध्यक्ष आहेत.

हेही वाचा: सूर्यमंदिर संस्थानाचे मठाधिपती हनुमान महाराज गिरी यांना अटक

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री कै. शंकरराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख व माजी मंत्री कै. बाबुराव काळे यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. दरम्यान, मागील काही दिवसांपासून त्यांना आरोग्याबाबत तक्रार जाणवू लागल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी (ता.25) त्यांची तब्येत अचानक खालावली होती. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री 7 वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ, एक बहिणी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील भायडी या त्यांच्या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

टॅग्स :Jalna