esakal | Bhokardan Rain: भोकरदन तालुक्यात बारा तासांपासून पावसाची रिपरिप सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Bhokardan

अधूनमधून जोर वाढत असल्याने सखल भागात साचले पाणी

भोकरदन तालुक्यात बारा तासांपासून पावसाची रिपरिप सुरू

sakal_logo
By
दिपक सोळंके

भोकरदन (जालना): भोकरदन शहरासह तालुकाभरात सोमवारपासून (ता.सहा) सुरू झालेली पावसाची रिपरिप दुसऱ्या दिवशी मंगळवारी देखील सुरू आहे. सलग बारा तासांहून अधिक वेळेपासून पाऊस सुरू असल्याने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तर हा पाऊस असाच सुरू राहिला तर खरीप पिके खराब होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीपासून पावसाचा लहरीपणा सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, जून महिन्यात खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने पाठ फिरविल्यामुळे पिके धोक्यात आली होती. मात्र, त्यानंतर पंधरा-पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर अधूनमधून बरसणाऱ्या रिमझिम पावसावर पिके आतापर्यंत तगली.

पावसाने ओढे वाहू लागले

पावसाने ओढे वाहू लागले

दमदार पाऊस नसल्याने कपाशी, सोयाबीनवर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईच्या काळात मोलमहागाचे औषध फवारणी करावी लागली. मात्र, गत आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने नद्या, नाले, ओढे, लहान, मोठ्या जलसाठ्यात मुबलक पाणी साठा जमा झाला. तर खरीप पिकांना देखील फायदा झाला. त्यानंतर मात्र, पावसाची भुरभुर सुरू होती. सोमवारी पोळा सण साजरा झाल्यानंतर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून, रात्रभरानंतर सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस पडत असल्याने व अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने शहरातील अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे. तर काही ठिकाणच्या शेतातही पाणी भरल्याने खरीप पिके पिवळी पडण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तवली जात आहे.

loading image
go to top