
Beed News: आयुष्याच्या जोडीदारासाठी आता ‘एक मराठा लाख मराठा’
Beed News: समाजामध्ये शिक्षण, बेरोजगारी, नोकऱ्या अशा विविध समस्या असतात. यात अलीकडे सर्वात मोठी समस्या म्हणजे तरुणांचे विवाह. बहुतांशी असलेल्या मराठा समाजात ही समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.
यावर आता बीडमध्ये एक मराठा लाख मराठा ही हाक देण्यात आली. सकल मराठा समाजाची रविवारी (ता. १२) बैठक पार पडली. यात राज्यस्तरीय वधु - वर सूचक मेळाव्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.
ता. २६ मार्चला (रविवारी) शहरात मोफत, वधु-वर सूचक मेळावा घेण्याचे निश्चित झाले. या मेळाव्यात पाल्य व पालक सोबत असतील तरच प्रवेश दिला जाणार आहे.
कुठल्याही समाजाचे शिक्षण, आरक्षण, नोकऱ्या आदी प्रश्न शासनाशी निगडीत असतात. मात्र, विवाह समस्या ही समाजाचा प्रश्न असल्याने त्यावर काम करण्याबाबत या बैठकीत एकमत झाले.
समाजातील विविध शासकीय अधिकारी, सेवानिवृत्त, शिक्षण, सामाजिक आदी क्षेत्रांतील मंडळींनी एकत्र येत हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर कधी काळी ‘एक मराठा लाख मराठा’ ही शासना विरोधात आरोळी ठोकणाऱ्या समाजाने आता समाजात जर्जर होत असलेल्या विवाह समस्येवर काम करण्याबाबत ठरविले आहे.
समाजात शेतकऱ्यांसह उद्योग व नोकऱ्यांत असलेले देखील अनेकजणांनी चाळीशी पार करुनही त्यांना आयुष्याचा जोडीदार मिळालेला नाही. यासाठी वधु-वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळावा मोफत असल्याने याला विवाहेच्छूक व पालकांकडून प्रतिसादही अधिक भेटेल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. शहरातील आशीर्वाद मंगल कार्यालयात (सोमेश्वर मंदिराजवळ) ता. २६ मार्चला हा मेळावा होणार आहे.
शासकीय व खासगी नोकऱ्यांत पुणे - मुंबई व बाहेरगावी असलेल्या मुलांना स्थानिक पातळीवर संपर्काला अडचणी येतात.
तसेच, समाज मोठा असल्याने व समाजात विविध मतप्रवाह असल्याचे कारणही विवाह समस्येचे मूळ आहे. त्यामुळे सकल मराठा परिवार, बीड म्हणून या प्रश्नावर एकत्र येण्याचा निर्णय समाजातील विविध घटकांनी घेतला.
मेळाव्यात सहभागासाठी अटी
मेळावा केवळ मराठा समाजासाठीच आहे. इतरांना प्रवेश नाही.
मेळावा पूर्णत: नि:शुल्क असून भोजनाचीही मोफत सोय आहे.
पाल्य (विवाहेच्छूक) व पालक सोबत असतील तरच सहभागी होता होईल.
नोंदणी करताना विवाहेच्छुकांच्या बायोडेटाच्या २० प्रति, २० रंगीत फोटोसह आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक.
मेळाव्यात सर्व घटकांचे उभारणार स्वतंत्र दालन
मेळाव्यात शिक्षण, नोकरीनुसार दालने उभारली जातील. उपवरांची अपेक्षा व पात्रतेनुसारच स्वयंसेवक बायोडेटानुसार उपवरांना त्या-त्या दालनात थांबवतील. त्यामुळे जोडीदार निवड करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.