
परभणी पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याचे स्पष्ट होत आहे.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे दगावलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले असुन तसा अहवाल प्राप्त झाला आहे. तसेच येथून जवळच असलेल्या कृष्णापूर येथेही कोंबड्या दगावल्याने आता जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
परभणी पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द येथे तीन ते चार दिवसापुर्वी ३४ पैकी २४ कोंबड्या दगावल्या होत्या त्यानंतर या परिसरातील क्षेत्र अलर्ट झोन म्हणून जाहीर केला. तसेच दक्षता पथकाची स्थापना करून त्यानुसार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पवार, जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. जावळे यांनी गावात जाऊन पाहणी केली. मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यां पैकी पाच कोंबड्याचे नमुने भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून यात या कोंबड्यांना स्ट्रेनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पिंपरी खुर्दच्या एक किलोमीटर अंतरावर पक्षी नष्ट केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच आता खबरदारी म्हणून जिल्ह्यात पक्ष्यांच्या वाहतुकीवर बंदी घातली आहे. दरम्यान कोंबड्यांचा मृत्यू झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात कळविण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तसेच सर्वेक्षणही हाती घेतले आहे. जिल्ह्यात २१ पोल्ट्री फाँर्म आहेत. त्यात एक लाख ६२ हजार पक्षी असल्याचे सांगण्यात आले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे