भाजप स्वबळाच्या तयारीत, शिवसेना गाफील!

प्रकाश बनकर
रविवार, 17 जून 2018

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद, परभणी मतदारसंघांत भाजपने वर्चस्व मिळविण्यासाठी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे.

औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही, याबाबत चर्चा सुरू असताना मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाने मात्र स्वबळावरची तयारी सुरू केली आहे. आपला खासदार नसलेल्या मतदारसंघात भाजपने जनसंपर्क वाढवला आहे. मराठवाड्यातील आठपैकी पाच मतदारसंघांत या पक्षाचे काही संभाव्य उमेदवार मागील काही महिन्यांपासून जोरदार तयारीला लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद, परभणी मतदारसंघांत वर्चस्व मिळविण्यासाठी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे खासदार असलेल्या मतदारसंघांत शिवसेनेने कुठल्याही हालचाली सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे आगामी निवडणूक शिवसेनेला जड जाणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजपने 'मिशन 350' चा संकल्प केला आहे. त्यानुसार राज्यात जोमाने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य, मंत्र्यांवर वेगवेगळ्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मराठवाड्यातील मतदारसंघांची जबाबदारी उत्तर प्रदेशातील राज्यमंत्री डॉ. महेंद्र सिंह यांच्याकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत तीन ते चार बैठकीही झाल्या आहेत. या बैठकीतून शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शिवसेनेचे विशेष प्राबल्य असलेल्या औरंगाबाद मतदारसंघातून चौथ्यांदा खासदार झालेल्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात भाजपतर्फे माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. श्री. गायकवाड यांनी नोव्हेंबर 2017 पासून मतदारसंघात जनसंपर्क सुरू केला आहे. तब्बत 911 गावांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्यासह विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांचीही नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या विरोधात मेघना बोर्डिकर यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघातील दोनशे ते तीनशे गावांत त्यांचा सतत संपर्क सुरू आहे. या मतदारसंघात पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकरही तयारीला लागले आहेत. उस्मानाबादेतून सुधीर पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तर नांदेडमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या विरोधात भास्कर खतगावकर यांचे नाव चर्चेत आहे. प्रताप पाटील चिखलीकर यांनीही दौरे सुरू केले असून, भेटीगाठींवर भर दिला आहे. हिंगोली मतदारसंघात कॉंग्रेसचे खासदार ऍड. राजीव सातव यांच्या विरोधात शिवाजी माने, शिवाजी जाधव यांनी तयारी सुरू केली आहे. अशीच स्थिती विधानसभेच्या मतदारसंघांतही पहायला मिळत आहे. 

संघटनात्मक बांधणी मजबूत -
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यात सव्वा महिन्यापासून बूथ रचनेच्या माध्यमातून काम सुरू आहे. वेळोवेळी बैठकीही घेतल्या जात आहेत. संघटनात्मक बांधणीचे काम निश्‍चितच शिवसेनेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे युती होवो अथवा न होवो, आम्ही सज्ज होत आहोत, असा दावा भाजपचे पदाधिकारी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेच्या गोटात फारशा हालचाली दिसत नाहीत. 

आदेश आले, पालन कुठे? 
सर्व मित्रपक्षांशी जुळवून घ्यावे, असे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी देशातील कोणत्याही मित्रपक्षासोबत तडजोडी करण्याच्या हालचाली सुरु केलेल्या नाहीत. जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपमध्ये जातात. त्यांचेच कल्याण होते, अशी चर्चा भाजपच्याच गोटात सुरु आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP and Shivsenas campaign for Lok Sabha elections