लातूर महापालिकेच्या सभेला भाजप नगरसेवकांची दांडी, अखेर सभाच रद्द

हरि तुगावकर
Monday, 1 June 2020

लातूर महापालिकेत सोमवारी (ता.एक) विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या समितीचे सभापती भाजपचे असताना सुद्धा याच पक्षाच्या नगरसेवकांनी सभेला दांडी मारून घरचाच आहेर दिला. त्यामुळे सभापतींना गणपुर्ती अभावी सभाच रद्द करावी लागली आहे.

लातूर : लातूर महापालिकेत सोमवारी (ता.एक) विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. या समितीचे सभापती भाजपचे असताना सुद्धा याच पक्षाच्या नगरसेवकांनी सभेला दांडी मारून घरचाच आहेर दिला. त्यामुळे सभापतींना गणपुर्ती अभावी सभाच रद्द करावी लागली आहे.

महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असली तरी स्थायी समितीवर मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या समितीच्या सदस्यांची गेल्या महिन्यात मुदत संपली. पण कोरोनामुळे शासनाने त्यांना मुदत वाढ दिली आहे. या समितीचे सभापती भारतीय जनता पक्षाचे अॅड.दीपक मठपती आहेत. त्यांनी सोमवारी शहरातील विविध विकास कामाच्या संदर्भात सभा आयोजित केली होती. या सभेचे सचिव सुनील चलवडे हे बेकायदेशीर सचिव आहेत.

लातुरात गळ्यात फळ, भाज्या, बांगड्याचे हार घालून आंदोलन, पाच जण ताब्यात

त्यामुळे ही सभा बेकायदेशीर आहे असा आक्षेप भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी घेतला होता. तसे निवेदन त्यांनी आयुक्तासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते. त्या पाठोपाठ भाजपच्या काही नगरसेवकांनी देखील या सभेला आक्षेप घेतला. सोमवारी आयोजित या बैठकीला काँग्रेसचे आठपैकी एकही नगरसेवक उपस्थित राहिला नाही. या सभेत भाजपचेही आठ सदस्य आहेत. त्यापैकी केवळ तीनच सदस्य उपस्थितीत राहिले. इतरांनी मात्र दांडी मारली. त्यामुळे ही सभाच रद्द करण्याची वेळ सभापती मठपती यांच्यावर आली. त्यामुळे पक्षातही मतभेद सुरु झाल्याची चर्चा महापालिकेत चांगलीच रंगली.

चार हजार डॉक्टर तातडीने उपलब्ध करून देणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा निर्णय

लातूरकरांना दिलासा, २१ अहवाल निगेटिव्ह
 विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत लातूर जिल्ह्यातील एकूण २१ व्यक्तींचे स्वॅब रविवारी (ता. ३१) तपासणीसाठी आले होते. या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे लातूरकरांना दिलासा मिळाला आहे.
संस्थेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी आलेल्या एकूण २१ स्वॅबपैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आलेल्या १५ व्यक्तींच्या स्वॅबचा समावेश होता. त्यापैकी सर्वच अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय (उदगीर) येथून एकूण सहा व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी होते. त्यापैकी सर्वच अहवाल निगेटिव्ह आले, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली. लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १३७ झाली आहे. यापैकी ७० जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ६४ जण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. उपचारादरम्यान आजवर तिघांचा मृत्यू झाला आहे.
---


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Corporators Not Attend Municipal Corporation Meeting Latur News