Exclusive : राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडांना भाजपची उमेदवारी...!

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 September 2019

ठोंबरेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कटल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आता श्रीमती ठोंबरे काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसने केज मतदार संघातून उमेदवारी जाहीर केलेल्या नमिता अक्षय मुंदडा या आता भाजपच्या उमेदवार असणार आहेत. त्यांचा भाजप प्रवेश आणि उमेदवारीची घोषणा लवकरच होणार आहे. एकिकडे पक्षातील आमदार सोडून जात असताना आता पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे खुद्द पवारांनी जाहीर केलेला उमेदवारही पक्षातून जाणे हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दिवंगत लोकनेत्या डॉ. विमलताई मुंदडा यांनी सलग पाच वेळा केज मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. दिवंगत मुंदडा यांनी आपली राजकीय सुरुवात भाजपमधून केली. त्या दोन वेळा भाजप तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडुण आल्या. नऊ वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रीपदही सांभाळले. दरम्यान, मागच्या निवडणुकीत त्यांच्या सुन नमिता मुंदडा यांचा भाजपच्या संगीता ठोंबरे यांच्याकडून पराभव झाला होता. परंतु, पराभवाच्या दुसऱ्या दिवशीपासून मुंदडा कुटूंबियांची या निवडणुकीसाठी तयारी सुरु होती. परंतु, मतदार संघातील पक्षांतर्गत गटबाजीमुळे मुंदडांची राजकीय गळचेपी होत असे. पक्षांतर्गत कुरघोड्यांच्या तक्रारी पक्षांच्या वरिष्ठांपर्यंतही गेल्या होत्या. मात्र, त्यावर कुठलाही ठोस पर्याय निघाला नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच नमिता मुंदडा यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी जाहीर केली. परंतु, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या सोशल मिडीयाच्या बॅनर/पोस्टरवरुन पक्षाचे चिन्ह आणि पवारांचे फोटो काढून टाकत आपल्या अस्वस्थतेला वाट मोकळी करुन दिली. त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना भाजपची उमेदवारीही मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, विद्यमान भाजप आमदार संगीता ठोंबरे यांनीही उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. अखेर सोमवारी सकाळी नमिता मुंदडा यांच्या भाजप प्रवेश आणि उमेदवारीला भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती ‘सकाळ’ला खात्रीलायक सुत्रांनी दिली. आज किंवा उद्या त्यांचा भाजप प्रवेश होऊन त्यांना उमेदवारी मिळणार आहे. जाहीर केलेला उमेदवार पक्षांतर करत असल्याने राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या निमित्ताने केज मतदार संघात नवीन राजकीय समिकरणे जन्माला येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांदाच राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर केले होते. यात केजमधून नमिता मुंदडा उमेदवार होत्या.

ठोंबरेंच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी कटल्यावरच शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी शेवटपर्यंत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. आता श्रीमती ठोंबरे काय भूमिका घेणार याकडेही लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP gives candidateship Namita Mundada in Kej for Maharashtra Vidhan Sabha 2019