आगामी दोन महिण्यात राज्यात भाजपचे सरकार- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दावा

गणेश पांडे
Monday, 23 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्राचारार्थ सोमवारी येथील अक्षदा मंगल कार्यालयात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

परभणी ः राज्य सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचे सांगत करत त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात विराजमान होईल असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता.23) परभणीत केला.

मराठवाडा पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्राचारार्थ सोमवारी येथील अक्षदा मंगल कार्यालयात जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,आमदार मेघना बोर्डीकर,  माजी आमदार मोहन फड, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, अभय चाटे, माजी आमदार रामराव वडकुते, समीर दुधगावकर आदींची उपस्थिती होती.

श्री.दानवे म्हणाले, मराठवाडा पदवीधर मतदार संघावर भाजपचा उमेदवार तीन वेळा निवडून आला आहे. (कै.) गोपीनाथराव मुंढे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या मुळेच हा मतदार संघ भाजपच्या ताब्यात राहिला. दोन वेळा जयसिंगराव गायकवाड व एक वेळा श्रीकांत जोशी यांनी मतदार संघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचा मतदार आहे हे सिध्द होते. परंतू गोपीनाथरावांच्या निधनानंतर हा मतदार संघ आपल्या हातून गेला असल्याचे सांगत त्यांनी परत तो मतदार संघ आता आपण ताब्यात घेतला पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी जनतेचे हालच -

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर बोलतांना श्री.दानवे यांनी या सरकारमध्ये सहभागी भिन्न विचारांच्या पक्षातील नेत्यामध्ये प्रचंड बेबनाव निर्माण झाला आहे. कुणाचा पायपुस कुणाला नाही. त्यामुळे हे सरकार येत्या दोन महिण्यात कोसळणार असल्याचे सांगत करत त्यानंतर भाजपचे सरकार राज्यात विराजमान होईल असा दावा ही केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी ही निवडणुक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. राज्यातील जनतेला भाजप सारखा पक्ष हवा आहे. ते या निवडणुकीतून परत सिध्द होईल असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांनी गेल्या 12 वर्षात पदवीधरांसाठी केलेले एक काम दाखवावे. 12 वर्षापैकी सात वर्ष त्यांची सत्ता होती. या सात वर्षात तरी त्यांनी केलेले एक ठळक काम दाखवावे असे सांगत सतीष चव्हाणांनी एकही प्रश्न विधान भवनात मांडला नाही. त्यामुळे त्यांना पदवीधरांच्या प्रश्नाची जाण नाही असा आरोप त्यांनी केला. श्री. दरेकर म्हणाले, पदवीधऱ मतदार संघाची ही निवडणुक राज्याची दिशा बदलणारी ठरणार आहे. भाजपचे राज्यात चांगले जाळे निर्माण झालेले आहे. या जाळ्याचा पुरेपुर उपयोग करून घेतला पाहिजे. पक्षाने सुक्ष्म नियोजन केले आहे त्यानुसार कार्यकर्त्यांनी स्वताच्या बुथवर किती आघाडी मिळविता येईल त्याचे नियोजन करून काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP government in the next two months - Union Minister Raosaheb Danve claims parbhani news