हिंगोलीत भाजपाचे दूध आंदोलन-आमदार मुटकुळेसह कार्यकर्त्यांना अटक

राजेश दारव्हेकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

यावेळी आमदार तानाजी मुटकुळेसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची अर्ध्या तासानंतर सुटका केली.

हिंगोली : गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर तर दूध पावडरला प्रति लिटर ५० रुपये अनुदान द्यावे आशा विविध मागण्यासाठी भाजपने हिंगोलीसह तालुका पातळीवर शनिवारी (ता. एक) दूध आंदोलन केले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळेसह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांची अर्ध्या तासानंतर सुटका केली.

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत राज्यभर दूध एल्गार आंदोलन करण्यात आले. त्यानुसार शनिवारी (ता. एक) सकाळी दहाच्या सुमारास भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नांदेड नाका परिसरातील अग्रसेन चौकात महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत, हातात भाजपचे कमळ असलेले झेंडे, फलक दूध आंदोलन सुरू केले. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनात ॲड. के. के. शिंदे, रिपाइंचे दिवाकर माने, फुलाजी शिंदे, संतोष टेकाळे, संजय ढोके, श्याम खंडेलवाल, हमीद प्यारेवाले, उमेश नागरे, अमोल जाधव, डॉ. वसंतराव देशमुख, प्रशांत सोनी, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा यशोदा कोरडे यांच्यासह वीस ते तीस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचाजयंती विशेष : साहित्य क्षेत्रातील शुक्रतारा- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद 

आंदोलनस्थळी शहर पोलीस ठाणेदार सय्यद यांनी कमांडोसह दाखल होताच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस वाहनातून शहर पोलीस ठाण्यात नेले. अर्धा तास बसवून प्रतिबंधक करुन सोडून देण्यात आले. शहर पोलीस ठाण्यात अचानक गर्दी कशी काय वाढली ? असा प्रश्न येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य सर्व नागरिकांना पडला होता. त्यानंतर मात्र भाजपचे आंदोलन असल्याचे सांगितल्याने काही तेथून निघून गेले.

संपादन-  प्रल्हाद काबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP milk agitation in Hingoli: MLA Mutkule and other activists arrested hingoli news