भाजप, शिवसेनेतर्फे रंगणार "प्रचार वॉर' 

शेखलाल शेख - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीमध्ये काडीमोड झाल्याने मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्‌युद्ध, पोस्टर वॉर रंगले आहे. आता मुंबईप्रमाणे औरंगाबाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला जशास तसे उत्तर देण्याचे धोरण शिवसेनेने आखल्याने येत्या काही दिवसांत वातावरण आणखी जास्त तापण्याची शक्‍यता आहे. युती होणार नाहीच, हे गृहीत धरून दोन्ही पक्षांनी तयारी केली होती. शिवसेनेने सर्वच्या सर्व 62 गटांत आणि 124 गणांत उमेदवार दिले आहेत; तर भाजपने सर्वच्या सर्व 62 गटांत उमेदवार दिले आहेत.

औरंगाबाद - शिवसेना-भाजप युतीमध्ये काडीमोड झाल्याने मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाक्‌युद्ध, पोस्टर वॉर रंगले आहे. आता मुंबईप्रमाणे औरंगाबाद जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला जशास तसे उत्तर देण्याचे धोरण शिवसेनेने आखल्याने येत्या काही दिवसांत वातावरण आणखी जास्त तापण्याची शक्‍यता आहे. युती होणार नाहीच, हे गृहीत धरून दोन्ही पक्षांनी तयारी केली होती. शिवसेनेने सर्वच्या सर्व 62 गटांत आणि 124 गणांत उमेदवार दिले आहेत; तर भाजपने सर्वच्या सर्व 62 गटांत उमेदवार दिले आहेत. पंचायत समितीच्या 122 गणांत त्यांचे उमेदवार असून पंचायत समितीची एक जागा रिपाइं (आठवले गट) तर एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्यात आली आहे. 

शिवसेनेतर्फे रणनीती 
शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार मैदानात दिल्याने तसेच 51 गटांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी उमेदवार आमने- सामने असल्याने बहुतांश ठिकाणी चौरंगी, पंचरंगी लढती होण्याची शक्‍यता आहे. यामध्ये सर्वच पक्षांनी जोरदार प्रचाराची तयारी केली असली, तरी अनेक गटांत शिवसेनेला भाजप जोरदार फाइट देणार असल्याचे गृहीत धरून शिवसेना नेत्यांनी मुंबईप्रमाणे आक्रमक प्रचाराची रणनीती आखली आहे. भाजप नेत्यांना निवडणुकीत जशाच तसे उत्तर देण्याचे धोरण यात असेल. प्रचारासाठी प्रत्येक गावातील शाखेला कामाला लावण्यात आले आहे. उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असली तरी शिवसेनेच्या सर्कलनिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. तसेच प्रचारात नेत्यांच्या सभा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आठ फेब्रुवारीपासून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजपमध्येच "प्रचार वॉर' बघायला मिळणार, हे निश्‍चित. 

भाजप मंत्र्यांच्या सभांवर जोर 
युती होणार नाही हे भाजप नेत्यांना अगोदर माहिती असल्याने त्यांनी नगरपालिकेप्रमाणे जोरदार तयारी करत सर्वच गटांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे 62 गटांत भाजपने उमेदवार दिले आहेत. शिवसेना आक्रमक प्रचार करणार हे माहिती असल्याने भाजपने एक महिना अगोदरच सर्कलनिहाय बैठक घेतल्या होत्या. ग्रामविकास मंत्री, विधानसभा अध्यक्षांच्याही नुकत्याच सभा झाल्या आहेत. यामध्ये इतर पक्षांतील नेत्यांना, कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. आता जवळपास सर्वच तालुक्‍यांतील महत्त्वाच्या गटांमध्ये भाजप मंत्र्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 

ग्रामीण भाग ढवळून निघणार 
शिवसेना-भाजपमध्ये आक्रमक प्रचार राहणार असल्याने तसेच दोघांतील मतविभाजनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार पुरेपूर करणार आहेत. त्यामुळे चौरंगी लढतीमध्ये चारही प्रमुख पक्षांमध्ये रणधुमाळी बघायला मिळण्याची शक्‍यता आहे. उमदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर काही उमेदवारांनी लगेचच आपापल्या गटांत भेटीगाठी, बैठका घेण्यास सुरवात केली आहे. 

आम्ही सर्व म्हणजे 62 गट, 124 गणांत उमेदवार दिले आहेत. सध्या सर्कलनिहाय बैठका सुरू असून आठ फेब्रुवारीपासून सभांना सुरवात करू. युती नसली तरी आम्ही जोरदार प्रचार करणार आहोत. प्रचारात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. 
अंबादास दानवे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख 

भाजपने महिनाभरापासून सर्कलनिहाय बैठकांना सुरवात केली आहे. आम्ही 62 गट, 122 गणांत उमेदवार दिले आहेत. रिपाइं, रासपला प्रत्येकी एक जागा सोडली आहे. भाजप मंत्र्यांच्या सभांचे नियोजन केले आहे. 
एकनाथ जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष 

Web Title: Bjp shiv sena fight election campaign