esakal | उस्मानाबादच्या महिला रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, रुग्णांना करावी लागते शोधाशोध
sakal

बोलून बातमी शोधा

2blood_20banking

उस्मानाबाद येथील महिला रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीसाठी रक्तच मिळत नसल्याचे प्रकार पाहायला मिळत आहे.

उस्मानाबादच्या महिला रुग्णालयात रक्ताचा तुटवडा, रुग्णांना करावी लागते शोधाशोध

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक रुग्णांची हेळसांड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. महिला रुग्णालयात गर्भवतींना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. ऐनवेळी कराव्या लागणाऱ्या सिझेरियन प्रसुतीसाठी रक्तच मिळत नसल्याचे प्रकार पाहायला मिळत आहेत.

जावईबापू सांभाळून ! पाहुणचाराचा बेत अंगलट येऊ शकतो


जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे रुग्णांना रक्तासाठी शोधाशोध करावी लागत आहे. खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागत आहे. शिवाय काही रुग्णांना एवढ्या कारणासाठी दुसरीकडे जायला सांगावे लागत असल्याची परिस्थिती आहे. अशावेळी रुग्णालय प्रशासनाने रक्तदानाची शिबिरे भरवुन रक्ताचा साठा करणे अपेक्षित आहे. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे नागरिक रक्तदान करण्यासाठी पुढे येत नसल्याची बाबही आरोग्य विभागाकडुन सांगण्यात येत आहे.

महिला रुग्णालयामध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज असून त्याठिकाणी असलेल्या रुग्णांना तेवढ्या कारणासाठी इतर ठिकाणी रेफर करण्याची वेळ येऊ लागली आहे. महिला रुग्णालयामध्ये येणारा रुग्ण अत्यंत सामान्य परिस्थिती असलेला असतो. शिवाय या रुग्णालयामध्ये बाहेरुन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासुन वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे महिला रुग्णालयामध्ये उपचाराला प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.

ग्रामीण रुग्णालयामध्ये होणाऱ्याही प्रसुती आता थेट महिला रुग्णालयामध्येच होत आहेत. या रुग्णाची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा बोजा रक्तामुळे पडत आहे. सिझेरियन प्रसुतीसाठी रक्ताची गरज लागते. त्यामुळे अगोदरच त्याची व्यवस्था करावी लागते. पण सध्या जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा असल्याने रक्त मिळत नसल्याची ओरड सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये या रुग्णांना रेफर करण्याशिवाय पर्याय राहत नसल्याची बाब पुढे केली जात आहे.

उस्मानाबादेत बारा तासात ४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त

त्यामुळे नाहक त्या रुग्णाची हेळसांड होत असल्याचे चित्र आहे. रक्ताचा पुरवठा करणे हे शासकीय रुग्णालयाची जबाबदारी आहे. मात्र अशावेळी रुग्णालय प्रशासन देखील हतबल झाल्याचे दिसुन येत आहे. यावर रक्तपेढीच्या डॉ. अश्विनी गोरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनीही रक्ताचा तुटवडा असल्याचे मान्य केले.


महिला रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी बहिणीला दाखल करण्यात आले होते. मात्र रक्ताचा तुटवडा असल्याचे सांगुन येथील डॉक्टरांनी रुग्णांला इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा पर्याय सांगितला होता. पण रक्त बाहेरुन आणण्यासाठी तयार झाल्याने प्रसुती करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे.
- विवेक विभुते, रुग्णाचे नातेवाईक


सध्या रक्ताचा तुटवडा असल्याने अशा तक्रारींना सामोर जावे लागत आहे. सिझेरियन प्रसुतीसाठी रक्त आवश्यक असते. अशावेळी तेच नसेल तर रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्याशिवाय पर्याय नसतो.
स्मिता गवळी, वैद्यकीय अधीक्षक, महिला रुग्णालय

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top