स्काॅर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

काल रात्रभरापासून रस्त्यावर उभ्या असलेल्या स्काॅर्पिओमध्ये रक्ताळलेल्या स्थितीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे्. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

परळी वैजनाथ (जि. बीड) : तालुक्यातील कावळेचीवाडी-म्हातारगाव रस्त्यावर एका स्कार्पीओ गाडीमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह मंगळवारी (ता.१०) सकाळी आढळून आला. रस्त्याच्याकडेला गाडी उभी असून गाडीमध्ये कुणीही नसल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सदरील प्रकार खुनाचा असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विजय सखाराम यमगर (वय ३० रा.दगडवाडी ता.परळी) असे मयताचे नाव आहे. कावळेचीवाडी-म्हातारगाव रस्त्याच्याकडेला रात्रीपासून एक स्कार्पिओ (एमएच-२४ व्ही-५१४८) उभी होती. सकाळी शेतात जाणार्‍यांनी या गाडीमध्ये डोकावून पाहिले. मात्र गाडीत कुणीच दिसले नाही. पाठीमागच्या सिटवर रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पोलीसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राहुल धस व परळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पूर्ण शर्ट रक्ताने माखलेला असून डोक्यामध्ये शस्त्राने वार करण्यात आले आहेत. सदरील प्रकार खुनाचा असून पोलीस तपास करत आहे.

हेही वाचा- आयुक्तांच्या स्वागताला जाताय तर जरा जपूनच... अन्यथा लागू शकतो दंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bloody corpse found in Scarpio