अबब..!  मागितले तीस लाख, एक लाख घेताना लागले गळाला 

मनोज साखरे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

लाच प्रकरणी पैठणचे तहसिलदार, वकील अन..पंटर ताब्यात 

औरंगाबाद - नोटाबंदी करा की आर्थिक व्यवहारावर करडी नजर ठेवा अथवा स्वीस बॅंकेतून काळा पैसा आणण्याचे सरकारचे प्रयत्न. पण पैसा मात्र छुप्या मार्गाने या हातातुन त्या हातात पळतच असून भ्रष्टाचाराला लगाम लागता लागेना. सरकारी व्यवस्था लाचखोरीने ग्रासली असतानाच पैठण येथील तहसिलदाराने एक दोन नव्हे तब्बल तीस लाखांची लाच मागितली. पहिल्या टप्प्यापोटी एक लाख रुपये घेताना त्यांच्यासह तिघे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत.

पैठण शहरात तहसिल कार्यालयातच रविवारी (ता. 29) ही कारवाई करण्यात आली आहे. यात तहसिलदार महेश नारायण सावंत (वय 41), वकील कैलास सोपान लिपणे पाटील (वय 38, रा. मित्रनगर), बद्रीनाथ कडूबा भवर (वय 35) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पैसे घेताना ताब्यात घेतले. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून माहिती देण्यात आली. त्यानुसार, तक्रारदार यांनी खरेदी केलेली कुळाची परत मिळावी यासाठी मुळ मालकाच्या नातेवाईकांनी पैठण येथील तहसिलदाराकडे दावा दाखल केला होता.

या सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजुने देण्यासाठी तहसिलदार, सबंधित वकील व एका पंटरने तक्रारदारला तब्बल तीस लाख रुपयांची मागणी केली. तसेच पहिल्या टप्प्यात एक लाख वीस हजार रुपये देण्याचे सांगितले होते. या विरोधात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करुन सापळा रचला व एक लाख रुपये घेताना संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी संशयितांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात कार्यवाही करण्यात येत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bribe taken by the tehsildar, lawyers