
Mango : चांगल्या दरासाठी आंबा एप्रिलमध्ये आणा बाजारात
छत्रपती संभाजीनगर : एप्रिलमध्ये बाजारात येणाऱ्या आंब्याला चांगला दर मिळतो तर त्यानंतर दर पडतात. गुजरातमधून केसर बाजारात आल्यानंतर मराठवाड्यातील केसर आंब्याचे दर खाली जातात. चांगला दर मिळवण्यासाठी एप्रिलमध्येच केसर आंबा बाजारात येईल यासाठी आंबा बागेचे व्यवस्थापन करावे लागणार आहे.
व्यवस्थापनाविषयी फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले की, बाजारात लवकर आंबा येण्यासाठी आता यंदाची काढणी झाल्यानंतर १५ ते २० मे दरम्यानच बागेची गरजेप्रमाणे छाटणी करून घ्यावी.
बागेला खत, पाणी द्यावे, त्यात नत्र युक्त खतांचा जोर वाढवावा, पाणी देणे सुरू ठेवावे जेणे करून १५ ते २० जून पर्यंत झाडाला मोठ्या प्रमाणात नवती (नवीन पालवी) फुटेल असे नियोजन करावे.
नवतीचे रस शोषक कीड, करपा आणि पाने खाणारी आळी या तीन मुख्य शत्रूपासून संरक्षण करावे यासाठी प्रतिबंधात्मक कीटकनाशकांची तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी. नवती पोपटी रंगाची होईपर्यंत एक दोन फवारण्या कराव्या. ०-५२- ३४ ची सात ते आठ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात. १५ - २० दिवसाच्या अंतराने फवारणी करावी त्यामुळे नवती लवकर पक्व होते.
बागेला ताणावर ठेवा
जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस चांगला झाला असेल आणि उन्हाळ्यात पावसाची अडचण येणार नाही अशी खात्री असेल तर झाडाच्या घेरात बुडाला कल्टार टाकावे. ऑगस्ट अखेर किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दुसऱ्यांदा नवती येते, तिलाही तिचेही संरक्षण करावे.
पावसाळा संपला की आंबा बागेचे पाणी तोडून तानावर ठेवावी. यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात फुल्ल मोहर येतो. एरवी हाच मोहर १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान येतो तोच मोहर एक महिना आधी येतो. मोहर संरक्षण करून त्याचे वेळापत्रक पाळावे. मोहर ७५ टक्के दिसू लागल्यावर पाणी सुरू करावे.
फेब्रुवारी, मार्चमध्ये फळगळ सुरू होते त्यावेळी फळगळ रोखण्यासाठी फळगळ नियंत्रण करावे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आंबे काढायला तयार होतात. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात माल काढायला मिळाले तर शेतात २०० रुपयांच्यापुढे भाव मिळतो असा विश्वास डॉ. कापसे यांनी व्यक्त केला.