वेड्या बहिणीची वेडी ही माया... कर्तव्य बजावणाऱ्या भावाला रस्त्यावरच बांधली राखी, ग्रामस्थ भारावले

चापोली : रक्षाबंधनाच्या दिवशीही आपले कर्तव्य बजावत असलेल्या आपल्या भावाला राखी बांधताना त्याची बहीण रूपाली. (छायाचित्र ः दीपक होनराव)  -------
चापोली : रक्षाबंधनाच्या दिवशीही आपले कर्तव्य बजावत असलेल्या आपल्या भावाला राखी बांधताना त्याची बहीण रूपाली. (छायाचित्र ः दीपक होनराव) -------

चापोली(जि. लातूर) : रक्षाबंधन हा बहीण-भावाचा पवित्र सण गुरुवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र येथील लक्ष्मण डावरे हे कोल्हापूर येथील प्रवाशांना नांदेडला घेऊन जाण्याचे आपले कर्तव्य बजावत होते. येथील त्यांच्या लहान बहीण रूपालीने त्यांना सकाळी रस्त्यावरच गाडी थांबवून राखी बांधली... हे दृश्‍य पाहून प्रवासी आणि ग्रामस्थ भारावून गेले होते. 
कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या महापुराने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. गावे व महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती. पूर ओसरला आणि बुधवारपासून (ता. 14) कोल्हापूरहून बससेवा सुरू करण्यात आली. चापोली येथील लक्ष्मण डावरे हे कोल्हापूर बस आगारामध्ये बसचालक म्हणून कार्यरत आहेत.

तेथे अडकलेल्या प्रवाशांना बसने दुसऱ्या गावी घेऊन जाण्याचे काम सुरू झाले. गुरुवारी रक्षाबंधनाचा सण होता. भाऊ कोठेही असला तरी या दिवशी राखी बांधून घेण्यासाठी आपल्या बहिणीकडे येतो. गुरुवारीही बसमध्ये अनेक भाऊ बहिणींकडून राखी बांधून घेण्यासाठी निघाले होते. मात्र लक्ष्मण हे सुटी न घेता आपले कर्तव्य बजावत होते. योगायोगाने कोल्हापूरमधील प्रवासी नांदेडला सोडण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. बहीण रूपालीला हे समजताच सकाळपासून चापोली येथे रस्त्याच्या कडेला ओवाळणीचे ताट आणि राखी घेऊन आपल्या भावाची ती वाट पाहत थांबली होती.

भाऊ लक्ष्मण आल्यावर त्याला रस्त्यावरच बस थांबवून राखी बांधून ओवाळले. हे सर्व दृश्‍य बसमधील प्रवासी व ग्रामस्थ पाहत होते. भाऊ सणाच्या दिवशी आपले कर्तव्य बजावतोय आणि त्याची लहान बहीण रस्त्यावरच त्याला राखी बांधत आहे, हे पाहून ग्रामस्थही भावुक झाले होते. वेड्या बहिणीची वेडी ही माया अशीच असते, अशा प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थ देत होते. 

सोशल मीडियावर कौतुक 
रूपालीने कर्तव्य बजावत असलेल्या आपल्या भावाला रस्त्यावरच राखी बांधण्याचा फोटो आणि व्हिडिओ काही क्षणांत सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या बहीण-भावांचे कौतुक केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com