‘बीएसएनएल’ची कार्यालये आता सौर उर्जेवर; लातूरमधील प्रकल्पाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

‘बीएसएनएल’च्या कार्यालयातील प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई विभागाचे प्रमुख महाप्रबंधक सुनीलकुमार यांच्या हस्ते झाले.

लातूर : भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) लातूर विभागीय कार्यालयाच्या छतावर १०० किलोवॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात अाला आहे. त्यामुळे हे कार्यालय आजपासून (ता. २९) सौर उर्जेवर कार्यान्वित झाले आहे. 

‘बीएसएनएल’च्या कार्यालयातील प्रकल्पाचे उद्घाटन मुंबई विभागाचे प्रमुख महाप्रबंधक सुनीलकुमार यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्य अभियंता (विद्यूत) आय. आर. यादवा (नागपूर), महाप्रबंधक यु. जी. निटुरे (लातूर), आदित्य ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आदिनाथ सांगवे, जयेश बजाज हे मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पामुळे वीजबिल कायमचे कमी होईल. त्यामुळे अशा प्रकल्पाची आजच्या काळात आवश्‍यकता आहे, अशा शब्दांत सुनीलकुमार यांनी प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त केले. आदिनाथ सांगवे म्हणाले, ‘‘सोलार एनर्जी कार्पोरेशन लिमिटेड नवी दिल्ली यांच्यातर्फे जाहीर करण्यात अालेल्या विशेष कार्यक्रमांतर्गत सरकारी इमारतीवर उभारण्यात येणाऱ्या अशा प्रकल्पातून निर्माण झालेल्या सौर उर्जा विक्रीचा कायम दर ३.६२ रूपये प्रति युनिट राहणार आहे. आदित्य ग्रीन एनर्जी असे ४.५ मेगावॉट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प महाराष्ट्रात बीएसएनएल आणि सीआरपीएफच्या कॅम्पवर सप्टेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित करणार आहे.’’

‘बीएसएनएल’च्या मुंबई, देवनार, पुणे, काेल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर येथील विभागीय कार्यालयात वेगवेगळ्या क्षमतेचे एकुण १०३० किलोवॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प अदित्य एनर्जी या कंपनीतर्फे उभारण्यात येणार आहेत. लातूरमधील कार्यालयातील प्रकल्प सुरू झाला असून आता इतर शहरातील प्रकल्प टप्याटप्प्याने सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होतील, अशी माहिती जयेश बजाज यांनी दिली.

Web Title: BSNL offices now have solar power The inauguration of the project in Latur