अर्थसंकल्प : औंढा नागनाथ, नरसी नामदेव तीर्थक्षेत्रासाठी मिळणार निधी

aundha nagnath mandir
aundha nagnath mandir

हिंगोली : वारकरी संप्रदायाचा देशभर प्रचार व प्रसार करणारे नरसी येथील संत नामदेव महाराज व बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा शुक्रवारी (ता. सहा) राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. विकास निधीची घोषणा झाल्याने या निर्णयाचे जिल्‍हाभरात स्वागत करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचा वर्ष २०२०-२१ साठीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. सहा) विधानसभेत सादर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प असल्याने या अर्थसंकल्पाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये जिल्ह्यातील औंढा नागनाथ, नरसी नामदेव तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता निधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. या निर्णयाचे जिल्‍हाभरात स्‍वागत करण्यात येत आहे.

शहराच्या वैभवात भर पडणार

आता लवकरच विकासकामे होऊन तीर्थक्षेत्राचा विकास होईल, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्‍त केली जात आहे. बारा ज्‍योतीर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ येथे वर्षभर भाविकांची रेलचेल असते. येथे श्रावणोत्‍सव, महाशिवरात्रोत्‍सव आदी कार्यक्रमास देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. अर्थसंकल्‍पात या मंदिराच्या विकासासाठी निधीची तरतूद झाल्याने भाविकांना सोयीसुविधा मिळणार असून शहराच्या वैभवात भर पडणार आहे. मंदिर परिसरासह शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

पंजाब राज्यातील  भाविकांचा  समावेश


तसेच संत नामदेव महाराजांचे जन्मस्‍थान असलेल्या नरसी नामेदव येथेदेखील देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. पंजाब राज्यातील शीख भाविकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. यासह राज्याभरातूनदेखील भाविक येथील कार्यक्रमात सहभागी होतात. वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलेचेल असते. येथे आषाढी एकादशी, पापलोचनी एकादशी, परतवारी यासह यात्रा महोत्‍सव, आषाढीनिमित्त नरसी ते पंढरपूर दिंडी आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. पंढरपूर दिंडीचे तीन ठिकाणी रिंगणाचे कार्यक्रम होतात. त्‍यामुळे नरसी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. अर्थसंकल्‍पात झालेल्या तीर्थक्षेत्रांच्या विकास निधीत नरसीचे नाव आल्याने जिल्‍ह्यातून या निर्णयाचे स्‍वागत केले जात आहे.

भाविकांना सुविधा उपलब्ध होणार

बारा ज्यार्तिलिंगांपैकी आठवे ज्‍योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथ देवस्‍थान देशभरात प्रसिद्ध आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता अर्थसंकल्‍पात अर्थमंत्री अजित पवार यांनी मंदिर विकासासाठी निधी जाहीर केला आहे. त्यामुळे भाविकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयाचे मंदिर समिती व भाविकांतर्फे स्वागत आहे.
- विद्या पवार, सहसचिव, नागनाथ मंदिर, औंढा नागनाथ


निर्णयाचे सर्व स्तरांतून स्‍वागत

अर्थसंकल्‍पात संत नामेदव महाराज यांचे जन्मस्‍थान असलेल्या संत नामदेव महाराज मंदिराच्या विकासासाठी निधीची घोषणा झाल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्‍वागत केले जात आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या वैभवात भर पडून भाविकांना सुविधा उपलब्ध होणार आहेत.
-रामेश्वर पाटील शिंदे 'अध्यक्ष, जीर्णोद्धार समिती, नरसी नामदेव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com