हिंगोलीत जवानाकडून अनवधानाने सुटली रायफलमधून गोळी 

राजेश दारव्हेकर 
Friday, 30 October 2020

हिंगोली येथे राज्य राखीव बल गट क्रमांक १२ आहे. येथे अनेक जवान कार्यरत आहेत. यामध्ये एका कर्मचाऱ्याकडून कर्तव्यावर असताना रायफलमध्ये गोळ्या भरण्याचे काम सुरु असताना शुक्रवारी (ता.३०) अनवधानाने रायफलमधून गोळी सुटली. यामध्ये कोणालाही इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या प्रकारानंतर बल गटाच्या जवानांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

हिंगोली : येथील राज्य राखीव बल गटातील एका कर्मचाऱ्याकडून शुक्रवारी (ता.३०) दुपारी दीडच्या सुमारास अनवधानाने रायफलमधून गोळी सुटली. रायफलमध्ये गोळ्या भरण्याचे काम जवान करत असताना हा प्रकार घडला. यामध्ये कोणालाही इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला. 

राज्य राखीव बल गट क्रमांक १२ मध्ये दुपारी दीडच्या सुमारास जवान वाबळे कर्तव्यावर असताना ते रायफलमध्ये गोळ्या भरण्याचे काम करत होते. नकळत त्यांचे बोट रायफलच्या स्ट्रिगरवर गेल्याने एक गोळी बाहेर पडली. ती शेजारीच काम करीत असलेल्या जवानाच्या कानाजवळून गेली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही, हे महत्वाचे. 

हेही वाचा - परभणीत पाटबंधारे मंडळ किंवा प्राधिकरण स्थापन करण्याची गरज- अभिजित धानोरकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रकाराची सविस्तर माहिती घेणार 
हा प्रकार घडल्याचा इतर जवानांना थांगपत्ताही नव्हता. काहींनी तर असा काही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. येथील समादेशक संगीतसिंग गिल रजेवर होते. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘कर्तव्यावर असलेल्या जवानाकडून पुरेशी काळजी न घेतल्याने अचानक रायफलमधून गोळी बाहेर पडली असावी. यात काही नुकसान झाले नाही. या प्रकाराची सविस्तर माहिती घेणार आहे.’ 

हेही वाचा - नांदेड : इयत्ता दहावी, बारावी परीक्षा शुल्क भरणा करण्याचे आवाहन

रॉकेल टाकून पेटवून घेत युवकाची आत्महत्या 
जिंतूर तालुक्यातील मानधनी येथे प्रमोद तळेकर (वय २६) यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.२९) घडली. घटनेमागचे नेमके कारण समजू शकले नाही. तालुका आरोग्य विभाग, ग्रामस्थांकडून समजलेल्या माहितीनुसार, प्रमोद अशोकराव तळेकर यांचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. गुरुवारी दुपारच्या सुमारास ते शेतात गेले. तेथे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून पंचनामा केला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश बोराळकर, कक्ष सहायक गंगाधर पालवे यांनी घटनास्थळीच उत्तरीय तपासणी केली. याप्रकरणी शुक्रवारी (ता.३०) दुपारपर्यंत नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दिलेली नव्हती. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A bullet from a rifle inadvertently escaped from a soldier in Hingoli, Hingoli News