नांदेड : रेल्वेतून पडल्याने बसवाहकाचा मृत्यू

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

राज्य परिवहन महामंडळाचा वाहक सचखंड एक्सप्रेस रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

नांदेड : राज्य परिवहन महामंडळाचा वाहक सचखंड एक्सप्रेस रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता शहराच्या समिराबाग भागात घडली. संजय हरिभाऊ कदम (वय ३८) मयत वाहकाचे नाव आहे. 

नांदेड आगारात वाहक या पदावर कार्यरत असलेले व शहराच्या क्रांतीनगर भागात भाड्याने राहणारे संजय कदम हे कामानिमित्त बाहेरगावी हजूर साहेब नांदेड ते अमृतसर या सचखंड एक्सप्रेसने औरंगाबादकडे शनिवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता निघाले. रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर गेल्यानंतर दरवाजामध्ये बसलेले कदम हे अचानक खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती वजिराबाद पोलिसांना मिळताच पोलिस हवालदार सय्यद आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले.

पंचनामा करून सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला. पोलिस निरीक्षक संदिप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे अंमलदार वाघमारे यांनी या घटनेची नोंद केली आहे. तपास सय्यद करित आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bus Conductor died after Collapsed from Train in Nanded